‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये सामील ! देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत पटकावले स्थान
By आनंद डेकाटे | Updated: October 8, 2025 18:52 IST2025-10-08T18:51:23+5:302025-10-08T18:52:29+5:30
देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत : डिजीसिएचे नामांकन जाहीर

Nagpur Flying Club joins the top ten! Ranked in the 'B' category of the best training institutes in the country
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या (डिजीसिए) तर्फे भारतातील ब श्रेणीतील उत्कृष्ट विमान चालक प्रशिक्षण संस्थांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. यात राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
नागपूर फ्लाईंग क्लबचे महाराष्ट्र शासनातर्फे संचलन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमान आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय नागरी विमान महासंचालनालयातर्फे उड्डान प्रशिक्षणाकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पुरेशा वेळ उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर दुसरा बेस तयार करण्यात आला आहे. मोरवा विमानतळावरील प्रशिक्षणालाही डिजीसिएची उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता मिळाली आहे.
भारतातील मान्यता प्राप्त विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या सुविधा संदर्भात नागरी विमान महासंचालनालयातर्फे नामांकन यादी जाहीर करण्यात येते. १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या नामांकनातील प्रत्यक्ष विमान प्रशिक्षणासंदर्भातील वर्गवारीनुसार ब श्रेणीमध्ये एकूण १३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर फ्लाईंग क्लब दहाव्या क्रमांकावर आहे.
मोरवा विमानतळावर प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सूविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे १२ फेब्रुवारी २०२५ पासून ७७२ पेक्षा जास्त तास उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सेसना-१५२ या श्रेणीतील तीन विमाने तर सेसना-१७२ या श्रेणीतील एक विमान आहे. प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत ४१ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी २६ विद्यार्थ्यांचे उड्डाण प्रशिक्षण व १० प्रशिक्षणार्थ्यांचे ग्राऊंड प्रशिक्षण सुरु आहे. अल्पावधितच नागपूर उड्डाण क्लबने प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था पूर्ण केल्यामुळे भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयातर्फे ब श्रेणीमध्ये समावेश होऊन पहिल्या दहा मध्ये रँकिग मिळविली असल्याचे विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.