लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औद्योगिक तसेच कृषी आधारित उत्पादनांना निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणांमुळे नागपूर विभागातून २२ हजार ६२७ कोटी लाख रुपयाची निर्यात झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ५ हजार १३० कोटी रुपयांची निर्यातीमध्ये वाढ झाली असून ही वाढ सरासरी २९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यातील तांदळाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे भंडारा जिल्ह्यातून २०३ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यातून १८२ टक्के निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्यातीला प्रोत्साहन दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यातून कृषी आधारित उत्पादनामध्ये विशेषतः तांदळाच्या निर्यातीमध्ये ९८ टक्के वाढ झाली आहे. गडचिरोली हा स्टिल हब म्हणून विकसित करताना कृषी आधारित उद्योगांच्या उभारणीमध्ये आघाडीवर असल्याचे सिद्ध होत आहे. या जिल्ह्यातून खनिकर्म तसेच औषध निर्मिती उद्योगांमधूनही निर्यातीला सुरुवात झाली आहे. नागपूर विभागातून तांदळाची निर्यात सातत्याने वाढत आहे.
कृषी आधारित उत्पादने व इतर उत्पादनांना सातत्याने जगात मागणी वाढत आहे. नागपूर जिल्ह्यातील २०२४-२५ या वर्षात १७ हजार ३४० कोटी रुपयांची निर्यात झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत ३ हजार ८६३ कोटी रुपयांनी म्हणजेच २९ टक्के वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील १ हजार ६ कोटी रुपये म्हणजेच ३२ टक्के, गोंदिया २ हजार १६१ कोटी म्हणजे २४ टक्के, भंडारा ४६५ कोटी म्हणजेच २०३ टक्के, चंद्रपूर १ हजार ६२२ कोटी म्हणजेच २० टक्के तर गडचिरोली जिल्ह्यातून ३२ कोटी म्हणजेच १८२ टक्के वाढ झाली आहे.
तांदळाच्या निर्यातीमध्ये विभागातून सातत्याने वाढ होत असून नागपूर जिल्ह्यातून १४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातून ९८ टक्के, भंडारा जिल्ह्यातून ६५ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यातून ९८ टक्के निर्यात झाली आहे. वर्धा जिल्ह्यातून कापसावर आधारित उत्पादनांमध्ये ५४ टक्के वाढले आहे. तसेच स्टेपल फॅब्रिकमध्ये २१ टक्के वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून शस्त्र आणि शस्त्रास्त्रे आदीमध्ये ६७ टक्के तर पेपर प्रोडक्टमध्ये ११ टक्के निर्यात झाली आहे. यापूर्वी नागपूर विभागातील झालेल्या निर्यातीमध्ये २०२१-२२ या वर्षात १४ हजार ५७० कोटी रुपये २०२२-२३ या वर्षात २३३ कोटी रुपये तर २०२३-२४ यावर्षात १७ हजार ४९७ कोटी रुपयांचे जगातील विविध देशांना निर्यात झाली आहे.
निर्यात धोरणांनुसार गुंतवणूकदारांना अनुदाननिर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार नागपूर विभागातून कृषी आधारित उत्पादनांसोबतच अभियांत्रिकी, न्युक्लियर रिअॅक्टर, स्फोटके (Explosives), फार्मासिटीकल, मेटलवेयर, आर्यन अॅण्ड स्टिल, टेक्स्टाईल, जेम्स अॅण्ड ज्वेलरी या उत्पादनांना निर्यातीला मोठ्या प्रमाणात मागणीची शक्यता असल्यामुळे त्यानुसार प्रोत्साहन देण्यात येणार आहे. निर्यात धोरणांनुसार गुंतवणूकदारांना अनुदान दिल्या जात असल्याचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी सांगितले