विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचे अखेरचे 'हे' दोन दिवस ; वैताग आणलेला मान्सून परतीच्या वाटेवर
By निशांत वानखेडे | Updated: October 8, 2025 20:49 IST2025-10-08T20:46:10+5:302025-10-08T20:49:22+5:30
Rain Update : विदर्भात शांत झाले ढग, चढला पारा ; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Monsoon Returns : Two days of rain in Maharashtra including Vidarbha; The monsoon that brought displeasure is finally on its way back
Vidarbha Rains : ऋतूच्या शेवटी सर्वत्र हाहाकार करीत वैताग आणलेला मान्सून आता परतीच्या वाटेवर लागला असून येत्या दाेन दिवसात ताे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून गाशा गुंडाळेल, असा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला आहे. दरम्यान दाेन दिवसात विदर्भात सर्वत्र ढग शांत झाले असून तापमान चढायला लागले आहे. त्यामुळे ऑक्टाेबर हीट वाढल्याची जाणीव हाेत आहे.
यंदा पावसाने चांगलेच झाेडपले. विदर्भात आतापर्यंत सरासरीपेक्षा १० टक्क्याहून अधिक पावसाची नाेंद झाली. शेवटच्या टप्प्यात तर मेघ धाे-धाे बरसले. सप्टेंबर महिन्याचा शेवट व ऑक्टाेबरचा पहिला आठवड्यात पावसाची जाेरदार हजेरी लागली. विशेषत्र: गडचिराेली, चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यात ६ ऑक्टाेबरपर्यंत जाेरात पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यातसुद्धा ढगांची गर्दी हाेती. जाेरदार पावसामुळे शेतीचे अताेनात नुकसान झाले. मराठवाडा व उर्वरित भागात पावसामुळे लाखाे एकर शेती पाण्यात गेली व शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास हिरावला गेला. त्यामुळे कधी एकदा पाऊस जाताे, अशी लाेकांची भावना झाली हाेती.
गेल्या दाेन दिवसात आकाश बऱ्यापैकी निरभ्र झाले असून ऑक्टाेबर हीटचा त्रास वाढला आहे. नागपूरला ३३ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. अमरावतीत सर्वाधिक ३४.८ अंशावर पारा हाेता. इतरही जिल्ह्यात ३२ ते ३४ अंशादरम्यान पारा आहे. भंडारा वगळता सर्व जिल्ह्यात आर्द्रता ६० ते ७० टक्क्यावर आली आहे. हवामान विभागाने बुधवारी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली हाेती, पण कुठेही ही स्थिती नाेंदवली गेली नाही. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने पुढे जात असून दाेन दिवसात महाराष्ट्रातूनही त्याचा पाय निघेल, अशी शक्यता आहे.