पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर मनसेचा ठिय्या; पत्र देऊनही आयुक्त भेट नाकारत असल्याने नाराजी
By कमलेश वानखेडे | Updated: April 10, 2023 18:30 IST2023-04-10T18:27:18+5:302023-04-10T18:30:02+5:30
टाळ-मृदंग वाजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला

पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर मनसेचा ठिय्या; पत्र देऊनही आयुक्त भेट नाकारत असल्याने नाराजी
नागपूर : शहरातील बहुतांश भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या अपुरा पुरवठा होत असल्याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या. पत्र देऊन भेटीची वेळ मागण्यात आली. मात्र, सुमारे दहा पत्र दिल्यानंतरही आयुक्त भेटीची वेळ देत नाही म्हणून मनसे कार्यकर्ते संतापले. सोमवारी मनसे कायर्कर्त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत टाळ-मृदंग वाजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदु लाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते मनपा आयुक्त कार्यालयासमोर जमले. शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असून महापालिका प्रशसानाकडे तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केली. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त हे फक्त सत्ताधाऱ्यांचेच आहेत का, शहरातील उर्वरित जनता वाऱ्यावर सोडली का, वारंवार पत्रत्र देऊनही आयुक्त भेटीसाठी वेळ का देत नाहीत, असा सवाल यावेळी करण्यात आला.
आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पोहचजले असता कार्यकर्त्यांनी विरोध केला. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. शेवटी पाणी प्रश्नावरील सर्व मागण्या ऐकूण घेण्यासाठी आयुक्तांनी २५ एप्रिल रोजी वेळ देण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलक नमले. आंदोलनात शहर उपाध्यक्ष उमेश बोरकर, शहर सचिव श्याम पुण्यानी, घनश्याम निखाडे, सहसचिव दुर्गेश साकुलकर,गौरव पुरी, विभाग अध्यक्ष प्रशांत निकम, उमेश उतखेडे, अंकित झाडे, अभिषेक माहुरे, सुरेश पाटिल, चेतन बोरकुटे महिला विभाग अध्यक्ष स्नेहा खोब्रागडे, कोमल गुरघाटे, रचना गजभिये, सुनिता कैथल आदींनी भाग घेतला.