नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 23:15 IST2025-10-12T23:15:18+5:302025-10-12T23:15:55+5:30
Mission Night Watch: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
नागपूर: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या २१७ ढाबे-हॉटेलवर महिन्याभरात कारवाई करण्यात आली. मुदतीहून जास्त वेळ सुरू राहणे किंवा दारूची विक्री करणे या प्रकरणांत या कारवाया झाल्या.
परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी ही मोहीम राबविली. रात्रीच्या वेळेस होणाऱ्या घरफोडी व गैरप्रकारांवर आळा बसावा यासाठी ३० ऑगस्ट पासून मिशन नाईट वॉच ची सुरुवात झाली. यासाठी सर्वात अगोदर परिमंडळ स्तरावर व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. त्यात सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार व दोन कर्मचारी होते. प्रत्येक ठाण्यातील रात्रपाळीतील अधिकाऱ्यांना दररोज त्यात समाविष्ट करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येत होते. याअंतर्गत रात्री अधिकारी, कर्मचारी मुदत संपल्यावरदेखील सुरू आस्थापना बंद करणे, आरोपींच्या घरी झडती घेणे, घरफोडीच्या हॉटस्पॉट्सच्या ठिकाणी सायरनसह पेट्रोलिंग करणे असे उपक्रम करत आहेत. विशेष म्हणज कर्तव्यावरील अधिकाऱ्यांना स्पॉटवरून फोटोदेखील टाकावे लागतात. उपायुक्त रश्मिता राव यादेखील रात्रीच्या बंदोबस्तात सक्रिय असतात. तसेच सूचनांप्रमाणे कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना लेखी खुलासादेखील मागविण्यात येतो. दररोजच्या कारवाईचा अहवाल सकाळी १० वाजेपर्यंत तयारदेखील होतो.
क्राईम मॅपिंगवर भर
या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी व वाहनचोरीचे हॉटस्पॉट्स निश्चित केले. त्याआधारे क्राईम मॅपिंगवर भर देण्यात आला. विशेष म्हणजे एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले असून बिट मार्शल्सद्वारा त्यांचे पंचिंग केले जाते.
असा आहे रोजचा क्रम
रात्री १० ते १२: आस्थापना तपासून कारवाई
रात्री १२ ते दोन: घरफोडीच्या रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी
रात्री दोन ते चार: सायरन पेट्रोलिंग व संशयितांची तपासणी
पहाटे चार ते सहा: गुडमॉर्निंग पेट्रोलिंग
घरफोडीच्या घटनांत ५७ टक्क्यांनी घट
‘मिशन नाईट वॉच’ ही मोहीम सुरू झाल्यावर ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये ५७ टक्क्यांची घट झाली आहे. तर सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत घरफोडीचे गुन्हे १० हून अधिक संख्येने घटले आहेत.
कारवाई: संख्या
हॉटेल/ढाबे आस्थापना वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणे: १८५
सार्वजनिक मैदानात दारू पिणे: ४१६
संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई: ३१
विनापरवाना दारू उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेल/ढाब्यांवर कारवाई: ३२