रक्ताचा तुटवडा

By Admin | Updated: May 16, 2016 03:00 IST2016-05-16T03:00:06+5:302016-05-16T03:00:06+5:30

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते.

Lack of blood | रक्ताचा तुटवडा

रक्ताचा तुटवडा

सुमेध वाघमारे  नागपूर
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ येते. याही वर्षी हीच स्थिती आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या ठणठणाटामुळे सर्वच रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.

उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अडीचशेवर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु सर्वच ठिकाणी जेमतेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. विशेषत: ‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढ्या ‘निगेटिव्ह’ ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत आहे. इतर ग्रुपमध्ये ‘एबी’, ‘ओ’ व ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे.

Web Title: Lack of blood