प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:43 AM2023-02-04T11:43:07+5:302023-02-04T11:43:17+5:30

अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार वितरण समारंभात आवाहन

Journalists should not forget the religion of asking questions - P Sainath | प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ

प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ

Next

नागपूर : आज माध्यमांमधून प्रश्न विचारण्याची ताकद हरवत चालली आहे. प्रश्न उपस्थित करणे हा पत्रकारितेचा खरा धर्म आहे. तो विसरला जाऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. स्व. अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणारा पत्रकारिता पुरस्कार-२०२० वनामती सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजित देशमुख होते. सत्कारमूर्ती ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह पुरस्कारप्राप्त पत्रकार तथा ज्यूरी मेंबर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, शैलेश पांडे, अरुण नाईक आणि प्रमोद माने व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्रामीणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये नगण्य वाव मिळत असल्याची खंत व्यक्त करून पी. साईनाथ म्हणाले, “देशातील ६९ टक्के जनता खेड्यात राहते. देशात ७८० भाषा रोजच्या व्यवहारात बोलल्या जातात. आदिवासींच्या भाषा कमी लोकांमध्ये बोलली जात असली, तरी त्यांची संस्कृती त्यातूनच टिकून आहे. राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ग्रामीणांना त्यांच्या प्रथम पानावर फक्त ०.६७ टक्का जागा मिळते, असे सेंटर फॉर इंडिया स्टडीजच्या अध्ययनातून पुढे आले. बॉलिवूड कलाकारांना टिपण्यासाठी माध्यमांचे २०० कॅमेरे असतात; मात्र सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.” माध्यमांच्या मुस्कटदाबीवरही त्यांनी भाष्य केले.

यावेळी डॉ. खुणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ज्यूरी मेंबरर्सच्या वतीने अभय देशपांडे, सत्कारमूर्तींच्या वतीने संजय आवटे आणि देवेंद्र गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. तर आभार मनोज जवंजाळ यांनी मानले.

यांचा झाला सन्मान

- २०२०-२१ साठीचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई लोकमतचे तत्कालीन सल्लागार संपादक दिनकर रायकर यांच्या निधनामुळे कुटुंबीयांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी स्वीकारला. १ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

- ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- मुद्रित माध्यमातील कामगिरीसाठी संजय आवटे (संपादक, लोकमत, पुणे), इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामगिरी नीलेश खरे (साम टीव्ही, मुंबई), शोधपत्रकारिता विश्वास वाघमोडे (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), कृषी पत्रकारिता डॉ. राधेश्याम जाधव (हिंदू बिझनेस लाइन, पुणे), ई-मीडिया तुषार खरात (लय भारी, मुंबई), सामाजिक पत्रकारिता देवेंद्र गावंडे (लोकसत्ता, नागपूर), महिला पत्रकार म्हणून मेघना ढोके (लोकमत, नाशिक) आणि कोरोना आरोग्यविषयक वृत्तांकनासाठी महेंद्रकुमार महाजन (सकाळ, नाशिक) या सर्वांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Web Title: Journalists should not forget the religion of asking questions - P Sainath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.