लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखती रविवारी राज्यपालांसमोर पार पडल्या. मात्र, यानंतरही राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरुपदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अद्यापही कुलगुरूंचे नाव गुलदस्त्यात असल्याने कुलगुरू कोण होणार? विशेष म्हणजे, पाच उमेदवारांमध्ये नागपूर विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार आणि डॉ. मनाली क्षीरसागर यांचे पारडे जड असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
दोन महिन्यांपासून रखडलेल्या कुलगुरुपदाच्या मुलाखती रविवारी झाल्या. या पाच उमेदवारांमध्ये डॉ. कोंडावार यांच्यासह दत्ता मेघे संस्थेतील तांत्रिक विभागाच्या संचालक डॉ. मनाली क्षीरसागर, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या डॉ. स्मिता देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. प्रशांत पाटील आणि आयआयटी रुरकीचे डॉ. कोल्हे यांचा समावेश आहे. नागपूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठीची प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. अर्जदारांपैकी २६ जणांच्या प्राथमिक मुलाखती झाल्यानंतर पाच जणांची यादी तयार केली जाते.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही यादी तयार झाली. ही पाच नावे कोणती आहेत, याबाबत अनेक अंदाज आजवर व्यक्त केले जात होते. मात्र, राज्यपाल कार्यालयाकडून त्या संदर्भात कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा प्रभार सध्या गुजरातचे राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे आहे. ३० नोव्हेंबरला त्यांनी पाचही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यानंतर कुलगुरूंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, रविवारी नाव जाहीर न झाल्याने पुन्हा उत्सुकता वाढली आहे.