रामटेक : हरभऱ्याचे पीक फुलाेऱ्यावर यायचे असून, त्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली आहे. घाटेअळीमुळे हरभऱ्याचे ३० ते ४० टक्के नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययाेजना कराव्या, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी केले आहे.
घाटेअळीचा मादी पतंग नवतीच्या पाने, कोवळा शेंडा, कळ्या व फुलावर खसखसच्या आकाराची अंडी घालताे. या अंड्यातून साधारणत: दोन-तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी सुरुवातीला पानावरील हरितद्रव्य खात असल्याने पाने पिवळी व पांढरी हाेऊन ती वाळतात व नंतर गळतात. या अळ्या मोठ्या झाल्यावर झाडांची पूर्ण पाने, कोवळी देठे फस्त करतात. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास झाडांच्या केवळ फांद्या शिल्लक राहतात. या अळ्या फुले व घाटे पोखरत असल्याने हरभऱ्याचे ३० ते ४० टक्के नुकसान हाेऊ शकताे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढू शकताे.
....
हे उपाय करा
पिकात नैसर्गिक पक्षी थांबे नसल्यास बांबूचे प्रति हेक्टरी २० त्रिकोणी पक्षी थांबे तयार करावे. पक्षी अळ्या वेचून खातात. एकरी दाेन किंवा हेक्टरी पाच कामगंध सापळे पिकापेक्षा उंच तयार करून त्यात कामगंध गाेळी ठेवावी. दोन-तीन दिवसात आठ-दहा घाटेअळीचे नर पतंग आढळल्यास घाटे ते याेग्य व्यवस्थापन समजावे. पिकाचे वेळावेळी निरीक्षण करावे. पिकात एक-दाेन घाटेअळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे अळीच्या व्यवस्थापनासाठी पीक ४० ते ५० टक्के फुलाेऱ्यावर आताना पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉसची पहिली फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी इमामेक्टीन बेंजोएट, किंवा इथिऑन किंवा क्लाेरॅन्ट्रानिलिप्राेलची दुसरी फवारणी करावी. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी दिली.