निशांत वानखेडेनागपूर : बाेर्डाच्या बारावीच्या परीक्षेत सामुहिक काॅपी करणाऱ्या दाेन परीक्षा केंद्रामधील तब्बल २४३ विद्यार्थ्यांवर बाेर्डाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी निकालासोबतच ही माेठी कारवाई केल्याचेही विभागीय बाेर्डाने जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. हा सामुहिक काॅपीचा प्रकार पेपर तपासताना लक्षात आल्याचे बाेलले जात आहे. वर्धा व गाेंदिया जिल्ह्यातील या दाेन केंद्रांची मान्यतासुद्धा कायमची रद्द करण्याचे बाेर्डाने जाहीर केले. एवढ्या माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर कारवाईचे हे अलीकडच्या वर्षातील पहिलेच प्रकरण हाेय.
नागपूर विभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या बायोलॉजी विषयाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करताना गंभीर अनियमितता आढळून आली. तपासात गोंदिया जिल्ह्यातील कातुर्ली येथील माऊली आर्ट अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजमधील १२५ विद्यार्थी आणि वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यात वाशी येथील जे. डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालयातील ११८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखी उत्तरे लिहिल्याचे आढळून आले. पेपर तपासणाऱ्या माॅडरेटरच्या तक्रारीनंतर बोर्डाने सखोल चौकशी समिती स्थापन करून संबंधित विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पाचारण केले. चौकशीत सामूहिक काॅपी झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर सर्व २४३ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबवून त्यांना थेट अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. या प्रकरणात सुनावणी घेताना व कारवाई करताना अत्यंत गाेपनीयता बाळगल्याचे पटवे यांनी सांगितले. थेट निकालाच्या दिवशीच हा प्रकार जाहीर करण्यात आला.
कठोर प्रशासकीय कारवाई
या गंभीर प्रकाराची दखल घेत बोर्डाने विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित शैक्षणिक संस्थांवरही कडक कारवाई केली आहे. दोषी आढळलेल्या दोन्ही शाळांची परीक्षा केंद्रे कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत. काॅपीप्रकरणात सहकार्य करणाऱ्या शिक्षक व पर्यवेक्षकांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांच्यावरही कठोर कारवाई होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित संस्थांविरुद्ध कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे शिवलिंग पटवे यांनी स्पष्ट केले.
३९ अन्य विद्यार्थ्यांवरही कारवाई
सामूहिक नकल प्रकरणांव्यतिरिक्त नागपूर विभागात इतर ३९ विद्यार्थ्यांवर विविध काॅपी प्रकरणांत कारवाई करण्यात आली. त्यांना काॅपी सापडलेल्या विषयात थेट नापास करण्यात आले. याशिवाय सेंट उर्सुला स्कूल येथील सेंटरवर भाैतिकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये माेबाईलद्वारे गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली हाेती. या प्रकरणाची लिंक नागपूरच्या शाळा आणि भंडारा येथील शिकवणी वर्गापर्यंत पाेहचली हाेती आणि अनेकांना अटकही करण्यात आली हाेती. या प्रकरणात आणखी कारवाई हाेण्याचे संकेत विभागीय अध्यक्ष पटवे यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यात उमरेड आणि गडचिरोली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासह एकूण दाेन विद्यार्थ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
Web Summary : 243 students failed after mass copying was discovered in Wardha, Gondia exam centers. Two schools' licenses revoked. Other 39 students were also penalized for cheating.
Web Summary : वर्धा, गोंदिया परीक्षा केंद्रों पर सामूहिक नकल पकड़े जाने पर 243 छात्र फेल। दो स्कूलों के लाइसेंस रद्द। अन्य 39 छात्रों पर भी नकल के लिए जुर्माना।