लाल कपडा दाखवून थांबविली गोंडवाना एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 09:56 PM2019-10-12T21:56:20+5:302019-10-12T21:57:04+5:30

रेल्वे रुळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे नटबोल्ट ढिले झाल्याची बाब एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आली. थोड्याच वेळात या रुळावरून गोंडवाना एक्स्प्रेस जाणार होती. त्या नागरिकाने लाल रंगाची ओढणी घेऊन गोंडवाना एक्स्प्रेस थांबविल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली.

Gondwana Express stopped by showing red cloth | लाल कपडा दाखवून थांबविली गोंडवाना एक्स्प्रेस

लाल कपडा दाखवून थांबविली गोंडवाना एक्स्प्रेस

Next
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकाची समयसूचकता : संभाव्य अपघात टाळण्यास केली मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वे रुळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे नटबोल्ट ढिले झाल्याची बाब एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आली. थोड्याच वेळात या रुळावरून गोंडवाना एक्स्प्रेस जाणार होती. त्या नागरिकाने लाल रंगाची ओढणी घेऊन गोंडवाना एक्स्प्रेस थांबविल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली. ही घटना शनिवारी दुपारी १.२५ वाजता इटारसी पुल ते मार्टिननगर दरम्यान घडली.
नारा येथील रहिवासी पंकज शिवराम कानफाडे (६३) असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांनी जबाबदार आणि जागरुक नागरिक असल्याचा परिचय दिला. कानफाडे हे एका ले- आऊटच्या कार्यालयात काम करतात. कार्यालयात असताना दुपारच्या सुमारास ते लघुशंकेला गेले असता त्यांना गोधनी-नागपूर दरम्यान किलोमीटर क्रमांक १०३९/७-५ येथे दोन रूळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे बोल्ट ढिले झाल्याचे दिसले. या रुळावरून रेल्वेगाड्या गेल्यास अपघात होऊ शकतो ही बाब त्यांनी हेरली. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी लगेच सायकलने जरीपटका पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जरीपटका पोलीस कानफाडे यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. दरम्यान कानफाडे यांनी कार्यालयाशेजारीच राहणाऱ्या कोमल नावाच्या युवतीला तिची लाल रंगाची ओढणी मागितली आणि कार्यालयातील एका लाकडाला बांधली. गोंडवाना एक्स्प्रेस येत असताना त्यांनी लाल झेंडी दाखविल्यामुळे गोंडवाना एक्स्प्रेस थांबली. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक एस. पी. सिंग, सुरेश दुलग, बी. एम. मदनकर पोहोचले. चाबी मॅनने नवीन नटबोल्ट लावल्यानंतर गोंडवाना एक्स्प्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली. कानफाडे यांनी समयसूचकता दाखविली नसती तर या मार्गावर अपघात घडला असता, हे निश्चित.

Web Title: Gondwana Express stopped by showing red cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.