फार्महाउसवर मैत्रिणीचा वाढदिवस, मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा होता बेत; उडी घेताच त्याला मृत्यूने गाठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:37 IST2025-10-14T18:35:58+5:302025-10-14T18:37:17+5:30
Nagpur : पाण्यात उतरताच त्याला जोरात विजेचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Friend's birthday at farmhouse, planned to swim in swimming pool with friends; died as soon as he jumped
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : स्विमिंग पूलमधील पाण्यात उतरताच तरुणाला जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेघाट -जुनी कामठी रोडवरील राज फार्म हाऊसच्या आवारात रविवारी (दि.१२) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. त्या पाण्यात वीजप्रवाह कसा प्रवाहित झाला, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
मयूर सुधाकर मांडवगडे (वय ३३, रा. रुक्मिणी नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. मयूर व त्याचा मित्र शुभम सुरेंद्र राघौरे (३०, रा. विनायक नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) हे दोघे त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून कन्हान परिसरातील राज फार्म हाऊस येथे आले होते. या फार्म हाऊसच्या आवारात स्विमिंग पूल असल्याने, तसेच त्यात पाणी भरून असल्याने मयूर पोहण्यासाठी पाण्यात उतरला.
पाण्यात उतरताच त्याला जोरात विजेचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच ठाणेदार वैजयंती मांडवधरे व पोलिस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. शिवाय, मयूरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित झाला कसा, याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी शुभम राघौरे याच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.