रेमडिसीवीर ब्लॅक मार्केटिंगमध्ये आणखी चौघांना बेड्या, १५ ते २० जणांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 22:43 IST2021-04-17T22:40:25+5:302021-04-17T22:43:17+5:30
आणखी ४ रेमडेसिविर जप्त - जरीपटक्यात दुसरा गुन्हा दाखल

रेमडिसीवीर ब्लॅक मार्केटिंगमध्ये आणखी चौघांना बेड्या, १५ ते २० जणांची चौकशी
नागपूर : रेमडेसिविर काळाबाजारी प्रकरणात पोलिसांनी आज सावंगी मेघे (वर्धा) तसेच नागपुरातील शुअरटेक हॉस्पिटलमधील वार्ड बॉयसह चाैघांना अटक करून ४ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. शनिवारी सायंकाळी जरीपटक्यात या संंबंधाने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर ठिकठिकाणच्या १५ ते २० जणांची चौकशी सुरू होती. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे रुग्णांना सरकारी अथवा खासगी ईस्पितळात बेड मिळणे कठीण झाले आहे. बेड मिळाला तर ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि अन्य औषधोपचाराची मारामार आहे. काही ईस्पितळातील डॉक्टर परिस्थितीची जाण असूनही रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिविर बाहेरून आणायचे सांगत आहे. ते मिळाले नाही तर रुग्णाचा जीव धोक्यात येईल, असे सांगत आहे. दुसरीकडे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची वृत्ती बाळगणारे भामटे रेमडेसिविरची काळाबाजारी करीत आहेत. ४ ते ५ हजारांचे इंजेक्शन २२ ते २५ हजारांत विकत आहेत. ‘मरता क्या न करता’ अशी स्थिती असल्याने रुग्णांचे नातेवाईक तेवढी रक्कम मोजायला तयार असल्यामुळे रेमडेसिविरच्या ब्लॅकमार्केटींगला जोर चढला होता.
या गंभीर प्रकाराची तेवढ्याच गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही ईनपूटसह परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांना या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली. त्यानुसार, उपायुक्त निलोत्पल यांनी सापळा रचून डमी ग्राहकाच्या माध्यमातून गुरुवारी सायंकाळी रेमडेसिविरच्या काळाबाजारीत सक्रीय असलेला डॉ.लोकेश शाहू आशा (आशा हॉस्पिटल, कामठी) याला ब्लॅकमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन विकताना रंगेहात पकडले. त्याच्या माहितीवरून वार्डबॉय शुभम मोहदुरे आणि कुणाल कोहळे (स्वस्थम हॉस्पिटल, वर्धा रोड) आणि सुमीत बागडे (दत्ता मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी) यांनाही बेड्या ठोकल्या. सध्या ते पीसीआरमध्ये असून त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आज वर्धा (सावंगी) येथील दत्ता मेघे हॉस्पिटलचा कर्मचारी सातपुते याला पकडले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० जणांची चौकशी सुरू केली.
स्वयंकथित पत्रकारासह तिघे जेरबंद
पोलिसांनी केलेल्या या दणकेबाज कारवाईमुळे अनेक पीडितांना दिलासा मिळाला. त्यातील एकाने शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना एका ब्लॅकमार्केटरची माहिती दिली. ती उपायुक्त निलोत्पल यांना कळली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा सापळा रचला. उपायुक्त निलोत्पल यांच्या विशेष पथकातील एपीआय भिसे, पीएसआय देवकते तसेच जरीपटक्याचे ठाणेदार नितीन फटांगरे यांनी विवेक ढाकणे पाटीलकडे संपर्क साधला. ४६हजारांत दोन रेमडेसिविर देण्याची तयारी दाखवून हा भामटा मध्यरात्री मार्टीननगरात पोहचला. तेथे पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन रेमडेसिविर जप्त करण्यात आले. त्याने दिलेल्या माहिवरून नंतर अमन शिंदे तसेच शूअरटेक हॉस्पिटलचा वार्ड बॉय ईश्वर उर्फ बिट्टू या दोघांना अटक करून त्यांच्याकडूनही दोन रेमडेसिविर जप्त करण्यात आले. विवेक पाटील नावाचा हा भामटा स्वताला एका न्यूज पोर्टलचा पत्रकार म्हणवून घेतो. त्याची क्रेटा कार, अन्य आरोपींच्या दोन बाईक, मोबाईल्स आणि रोख १३ हजार असा एकूण ६ लाख, ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ते १५ रेमडेसिविर जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले
दरम्यान, गुरुवारी रात्री जप्त करण्यात आलेले १५ रेमडेसिविर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सोपविले. आणीबाणीच्या काळात ते गरजूंच्या उपयोगात येणार आहेत. पोलिसांच्या या दणकेबाज कारवाईमुळे सर्वत्र काैतूक होत आहे. आणखी अनेक जण कारवाईत अडकण्याचे संकेत पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी दिले आहे.