सीबीआय तपासणार तथ्य

By Admin | Updated: May 20, 2015 02:50 IST2015-05-20T02:50:33+5:302015-05-20T02:50:33+5:30

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची सीबीआय सूक्ष्मरीत्या तपासणी करीत आहे.

Facts to be examined by CBI | सीबीआय तपासणार तथ्य

सीबीआय तपासणार तथ्य

नागपूर : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची सीबीआय सूक्ष्मरीत्या तपासणी करीत आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच कागदपत्रातील नोंदीच्या तपासणीसोबतच अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबानीतील (बयाण) तथ्यही तपासले जात आहे. या सर्व बाबींची शहानिशा झाल्यानंतरच सीबीआयचे अधिकारी कारवाईचे स्वरूप ठरवणार आहेत.
लक्षवेधी ठरलेल्या लाखोंच्या पेंटींग रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे, त्याऐवजी दुसऱ्याच बनावट पेंटिंग आढळणे, कार्यालयीन खर्चाच्या नावावर झालेली उधळपट्टी, अनेक कार्यक्रमावर झालेला लक्षावधीचा संशयास्पद खर्च या आणि अशाच गैरप्रकाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सोमवारी सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआयच्या पथकाने दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर छापा घातला. छाप्यादरम्यान विविध फाईल्ससह महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयानही नोंदवले. ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या नोंदी, प्रत्यक्षात झालेला खर्च आणि ज्यांच्या नावे बिल जोडण्यात आली, त्या सर्वांचीच तपासणी केल्यानंतर सीबीआय येथील कारभाराचा निष्कर्ष काढणार आहे. या निष्कर्षावरच संबंधितांवर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सीबीआयचे सूत्र सांगतात. (प्रतिनिधी)

Web Title: Facts to be examined by CBI