शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या हाती नको

By Admin | Updated: August 22, 2016 02:44 IST2016-08-22T02:44:47+5:302016-08-22T02:44:47+5:30

आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे.

Education is not in the hands of the government | शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या हाती नको

शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या हाती नको

मुकुल कानिटकर : सामाजिक मुद्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत वैचारिक मंथन
नागपूर : आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे. देशातील शिक्षणप्रणालीचा कायापालट करायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबाबतच्या विचारांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच शिक्षणाची दुरावस्था दूर होईल, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘शिक्षणतज्ज्ञ बाबासाहेब’ या विषयावर बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भारतामातेवर निष्ठा होती. ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे भारताला जगासमोर मांडले. शिक्षण हे समाजप्रबोधनाचे साधन आहे हे बाबासाहेबांचे ठाम मत होते. व्यक्तीला स्वावलंबी बनविणारे, नैतिक मूल्य वाढविणारे व स्वायत्त व्यवस्था असलेले शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता.
परंतु बाबासाहेबांचे विचार शिक्षणव्यवस्थेत अंगिकारण्यात आले नाहीत, हे दुर्दैव आहे. कारण तसे झाले असते तर प्रत्येक अभ्यासक्रमातून समाजप्रबोधन झाले असते व अशा स्थितीत अशी परिषद घ्यावीच लागली नसती, असे कानिटकर म्हणाले. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)

संविधान हीच देशाची संस्कृती : वेदप्रकाश मिश्रा
परिसंवादादरम्यान डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘संस्कृतीचे संविधान की संविधानाची संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ही आहे. संविधानाच्या प्रास्ताविकाच्या सुरुवातीला ‘आम्ही’ असा शब्द वापरण्यामागे बाबासाहेबांचा सखोल विचार होता. आपल्या देशातील सर्वात पवित्र ग्रंथ हा संविधानच आहे व खऱ्या अर्थाने संविधान हीच देशाची संस्कृती आहे. संविधान आल्यानंतरच गुलामगिरीची मानसिकता दूर झाली. संविधानाला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी ही तरुण पिढीची आहे. त्यांनी संविधानाला खोलवर जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.

Web Title: Education is not in the hands of the government