विदर्भातील रेती तस्करांना 'ईडी'चा दणका ! नागपुरातील नऊ, तर बैतुल भंडाऱ्यातील एकावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:10 IST2026-01-10T15:09:17+5:302026-01-10T15:10:34+5:30

Nagpur : रेतीची बनावट रॉयल्टी आणि 'ई-टीपी' (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वेगवेगळ्या पथकांनी नागपूर, भंडारा आणि मध्य प्रदेशातील बैतूल येथे धाडी टाकल्याने राजकीय वर्तुळासोबत रेती व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ED hits sand smugglers in Vidarbha! Action taken against nine in Nagpur and one in Betul Bhandara | विदर्भातील रेती तस्करांना 'ईडी'चा दणका ! नागपुरातील नऊ, तर बैतुल भंडाऱ्यातील एकावर कारवाई

ED hits sand smugglers in Vidarbha! Action taken against nine in Nagpur and one in Betul Bhandara

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/सावनेर/भंडारा :
रेतीची बनावट रॉयल्टी आणि 'ई-टीपी' (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वेगवेगळ्या पथकांनी नागपूर, भंडारा आणि मध्य प्रदेशातील बैतूल येथे धाडी टाकल्याने राजकीय वर्तुळासोबत रेती व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन ठिकाणच्या नऊ रेती तस्करांच्या घरी एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. यात सावनेर व पाटणसावंगी येथील प्रत्येकी चार व खापा येथील एका रेती तस्कराचा समावेश आहे. या कारवाईला शुक्रवारी (दि. ९) पहाटे ४ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया दिवसभर सुरू होती. ईडीची वेगवेगळी पथके सावनेर शहरातील विनोद गुप्ता, प्रफुल्ल कापसे, लक्ष्मीकांत सातपुते व रवींद्र ऊर्फ दादू कोलते, पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील शरद राय, मनोज गायकवाड, अमोल ऊर्फ गुड्डू खोरगडे व नरेंद्र पिंपळे  तसेच खापा (ता. सावनेर) येथे अमित राय यांच्या घरी शुक्रवारी पहाटे एकाचवेळी धडकली.

गुड्डू खोरगडेवगळता अन्य आठजण ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरीच सापडल्याने त्या सर्वांना त्यांनी ताब्यात घेतले. दादू कोलते याच्या घरी दुपारी २ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्याच्या घरून निघून गेले. त्यांनी दादू कोलतेला मात्र ताब्यात घेतले नाही.

मध्यंतरी बनावट रॉयल्टी व 'ई-टीपी' प्रकरण चव्हाट्यावर आले होते. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील काही रेती तस्करांना ताब्यात घेतले होते, तर काही फरार झाले होते. ईडी कारवाईचा याच प्रकरणाशी संबंध जोडला जात असला तरी सर्व रेती तस्कर राजकीय पक्षांचे पदाधिकारी असून, त्यांचे नेत्यांशी लागेबांधे आहेत. या कारवाईत रेती तस्करांकडील संपूर्ण अधिकृत व अनधिकृत संपत्ती, रेती उपसा व वाहतुकीची कागदपत्रे, बनावट कागदपत्रे, मध्य प्रदेश कनेक्शन यासह इतर महत्त्वाच्या बाबी तपासल्या जात असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

लोभीतील रेती तस्करही अडकला

तुमसर तालुक्यातील लोभी येथे शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रेती तस्कराविरोधात ईडीच्या पथकाने कारवाई केली. यात रेती व्यवसायाशी संबंधित अजय गहाणे यांच्या महामार्गावरील दुकानासह निवासस्थानी पथकाने एकाचवेळी छापे टाकले. भंडारा जिल्ह्यात ईडीची अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे. तुमसर तालुक्यात गत काही काळापासून विनारॉयल्टी रेती विक्री केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या आधारेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. छापेमारीदरम्यान आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी सुरू असून, कागदपत्रे, रोकड आणि इतर पुराव्यांची पाहणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

रेती तस्करांचे केदार कनेक्शन

विनोद गुप्ता हे आधी भाजपमध्ये होते. अलीकडे त्यांनी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी जवळीक साधली. लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते, शरद राय, मनोज गायकवाड, गुड्डू खोरगडे, नरेंद्र पिंपळे व अमित राय हे सर्व सुनील केदार समर्थक आहेत. मध्यंतरी नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी भाजपमध्येही प्रवेश केला होता. याशिवाय प्रफुल्ल कापसे हे उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांचे धाकटे भाऊ आहेत.

सदर ठाण्यात २०२२ मध्ये झाला होता गुन्हा दाखल

रेती तस्करांवर शुक्रवारी ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या असून, या प्रकरणात सदर पोलिस ठाण्यात १९ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. एका व्यक्तीला बोगस रॉयल्टी कागदपत्र वापरून अवैध रेतीची तस्करी करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणी सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यातील आरोपींवर ईडीने धाडी घातल्याची माहिती आहे.

आ. देशमुखांच्या नाराजीनंतर झाली होती पिंपळे, राय यांची भाजपमधून हकालपट्टी

सावनेर नगरपरिषदेची निवडणूक रंगात आली असताना काँग्रेस नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता. रेती तस्करीत सहभागी असलेल्या राय व पिंपळे यांना आज भाजपमध्ये प्रवेश दिला, उद्या हे रेती तस्कर महसूल मंत्र्यांच्या गाडीत दिसतील, लोकांमध्ये काय संदेश जाईल, अशी उघड नाराजी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी पक्ष कार्यालयात आयोजित प्रचार बैठकीत केली होती. संबंधित रेती तस्करांचे प्रवेश रद्द केले नाहीत तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आ. देशमुख यांच्या या नाराजीची लगेच दखल घेत राय व पिंपळे यांचा प्रवेश रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा भाजपकडून जाहीर करण्यात आले होते.

१५४ कारवायांचे नियोजन

ईडीने देशभरात एकूण १५४ ठिकाणी धाडी टाकण्याचे नियोजन केले असून, त्यात महाराष्ट्रातील ५४ व नागपूर जिल्ह्यातील ९ धाडींचा समावेश आहे. ईडीचे अधिकारी गुरुवारी (दि. ८) रात्री ११ वाजता दिल्लीहून रवाना झाले व रात्री उशिरा नागपूर शहरात पोहोचले. प्रत्येक धाडीसाठी तीन वाहने, प्रत्येक वाहनात चालकाव्यतिरिक्त चार अधिकारी व चार गार्डचा समावेश आहे.

Web Title : विदर्भ में रेत माफिया पर ईडी का छापा: नागपुर, भंडारा, बैतूल में कार्रवाई

Web Summary : विदर्भ में रेत माफिया पर ईडी का छापा, रॉयल्टी धोखाधड़ी का मामला। नागपुर, भंडारा और बैतूल में तलाशी, राजनीतिक संबंध और अवैध संपत्ति उजागर। जांच जारी।

Web Title : ED Raids Vidarbha Sand Mafia: Action in Nagpur, Bhandara, Betul

Web Summary : ED raids target sand mafia in Vidarbha over royalty fraud. Nagpur, Bhandara, and Betul locations searched, revealing political connections and illegal assets. Investigations continue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.