धवनकरांमुळे कुलगुरूंची कोंडी

By Admin | Updated: June 16, 2015 02:44 IST2015-06-16T02:44:59+5:302015-06-16T02:44:59+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठावर धडक दिली.

Due to Dhawan, the Vice Chancellor | धवनकरांमुळे कुलगुरूंची कोंडी

धवनकरांमुळे कुलगुरूंची कोंडी

शैक्षणिक सहलीत गैरव्यवहाराचा आरोप : विद्यार्थी पुन्हा धडकले
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठावर धडक दिली. विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी शैक्षणिक सहलीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, डॉ. धवनकर यांनी या दौऱ्यातील हिशेब सादर केला असून, त्याचे ‘आॅडिट’ झाल्यावर १९ तारखेला पुढील निर्णय घेऊ, असे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली येथे विभागाच्या विद्यार्थ्यांचा ‘स्टडी टूर’ गेला होता. यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत ३७ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी लावला आहे. याबाबत धवनकर यांना हिशेब मागितला असता त्यांनी त्याला दाद दिली नाही. काही दिवसांअगोदर नवी दिल्लीहून परतल्यावर त्यांनी बोगस देयके दिली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. काणे यांच्याकडे तक्रार केली होती. धवनकर यांना हिशेब सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी हिशेब जमा केला. परंतु विद्यार्थी त्यावर समाधानी नाहीत. यासंदर्भात सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरूंची भेट घेतली.
डॉ. धवनकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सर्व कागदपत्रे व देयकांची ‘आॅडिटर्स’ कडून तपासणी करू व त्यानंतरच योग्य तो निर्णय घेऊ, असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले. विद्यार्थी मात्र आपल्या मागणीवर अडून होते व त्यांनी कुलगुरूंच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यापीठ प्रशासन तसेच कुलगुरू हे दबावात असून धवनकर यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या मुद्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विद्यार्थी भेट घेणार आहेत. १९ तारखेला जर कुलगुरूंनी विभागप्रमुखांवर कारवाई केली नाही तर जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to Dhawan, the Vice Chancellor