सर्व्हर डाऊन, ग्राहकांना मनस्ताप

By Admin | Updated: August 15, 2014 00:41 IST2014-08-15T00:41:43+5:302014-08-15T00:41:43+5:30

बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद

Downstream Server, Consumers Trouble | सर्व्हर डाऊन, ग्राहकांना मनस्ताप

सर्व्हर डाऊन, ग्राहकांना मनस्ताप

बँक आॅफ इंडिया : डाटा सेंटरमधूनच होता बिघाड
नागपूर : बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद असल्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला.
लाखो ग्राहकांशी नाते जोडलेल्या बँक आॅफ इंडियाच्या सर्वच शाखांमधील सर्व्हरमध्ये आज सकाळी ८ वाजेपासूनच बिघाड झाला. या तांत्रिक दोषामुळे व्यवहारावर परिणाम झाला. प्रत्येक ग्राहक विचारपूस करून परतत होता. बँक बंद होईस्तोवर ही परिस्थिती राहिल्याने अनेकांना ताटकळत उभे राहूनही काहीच फायदा झाला नाही.
बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळपासूनच डाटा सेंटरमधून बिघाड झाला. त्यामुळे या ठिकाणी सर्व्हरची लिंकिंग नव्हती. प्रत्येक शाखेमध्येच हा बिघाड झाला होता; कारण तांत्रिक दोष मुंबईच्या कार्यालयातून होता. दुपारपर्यंत सर्व्हर सुरू होण्याची शक्यता होती. परंतु तांत्रिक दोष मोठा असल्याने दुरुस्ती होऊ शकली नाही. ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्येकालाच उत्तर द्यावे लागत होते. सकाळी बँकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुपारी १ पर्यंत येऊन पाहा, असे उत्तर दिले. मात्र, तोपर्यंत हा बिघाड कायमच होता. या बँकेत व्यापारी, कर्मचाऱ्यांसह हजारो ग्राहकांची खाती आहेत. शहरातील सर्वच शाखांमध्ये सकाळपासून ही परिस्थिती असल्याने, अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. पुन्हा दुपारी ३ वाजेपर्यंत हा दोष दुरुस्त होण्याची शक्यता काही कर्मचाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, नंतरही तीच परिस्थिती कायम राहिली. परिणामी, बँकेतील रोखपालांनी आपल्या काऊंटरवर बंदचाच फलक लावला. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देणे अनिवार्य झाले होते. आज कामकाजाचा दिवस, उद्या स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि परवा शनिवार अर्धवेळ कामकाजाचा दिवस व नंतर रविवारची सुटी यामुळे अनेक ग्राहकांना बँकेच्या या तांत्रिक बिघाडामुळे पैशाविनाच सुटीचे आणि खरेदीचे बेत आखावे लागणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Downstream Server, Consumers Trouble