खर्चाचा तपशील न देणारा उमेदवार ठरू शकतो अपात्र

By Admin | Updated: May 20, 2014 00:51 IST2014-05-20T00:51:03+5:302014-05-20T00:51:03+5:30

लोकसभा निवडणूक आटोपली, निकाल जाहीर झाले तरी निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक खर्च कक्षाचे कामकाज अजून एक महिना सुरूच राहणार आहे.

Disqualified candidates may be unpaid candidates | खर्चाचा तपशील न देणारा उमेदवार ठरू शकतो अपात्र

खर्चाचा तपशील न देणारा उमेदवार ठरू शकतो अपात्र

नागपूर : लोकसभा निवडणूक आटोपली, निकाल जाहीर झाले तरी निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक खर्च कक्षाचे कामकाज अजून एक महिना सुरूच राहणार आहे. निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराला १५ जूनपर्यंत खर्चाचा तपशील सादर करायचा असून, त्याने तो न केल्यास किंवा चुकीचा केल्यास त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. यंदाची लोकसभा निवडणूक जशी मोदींच्या प्रचारामुळे गाजली तशीच निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष कक्षामुळेही गाजली. पहिल्यांदाच निवडणुकीवर होणार्‍या खर्चावर आयोगाकडून समांतरपणे लक्ष ठेवण्यात आले व त्याची नोंदही करण्यात आली. उमेदवाराने सादर केलेल्या खर्चाच्या विवरणावर अवलंबून न राहता खर्च नियंत्रण कक्षाचे अधिकारी स्वत:च्या यंत्रणेमार्फत त्याची पडताळणी करीत होते. उमेदवाराने खर्च कमी दाखविल्यास त्याला खुलासाही मागविण्यात येत होता. रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख उमेदवारांना याबाबत नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या व खुलासेही मागविण्यात आले होते. उमेदवारांनी प्रचाराच्या काळात दोन टप्प्यात त्यांच्या खर्चाचे तपशील सादर केले. त्यानंतर म्हणजे मतमोजणीपर्यंतचा खर्च उमेदवरांना १५ जूनपर्यंत सादर करायचा आहे. निवडणूक खर्च तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतरही या कक्षाचे कामकाज १५ तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे. नागपूर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण ५६ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांना पुढच्या काळात त्यांच्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. ज्यांनी खर्च सादर केला नाही त्यांच्यावर आयोगाकडून अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. तसे पत्रही प्रत्येक उमेदवारास देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disqualified candidates may be unpaid candidates