आयटीआय प्रवेशाचा वाद हायकोर्टात

By Admin | Updated: August 24, 2016 02:38 IST2016-08-24T02:38:48+5:302016-08-24T02:38:48+5:30

उत्तर अंबाझरी रोडस्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ‘इन्फर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

The dispute in the ITI High Court | आयटीआय प्रवेशाचा वाद हायकोर्टात

आयटीआय प्रवेशाचा वाद हायकोर्टात

१४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश
रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान

नागपूर : उत्तर अंबाझरी रोडस्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ‘इन्फर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड सिस्टीम मेंटेनन्स’ या पदविका अभ्यासक्रमातील १४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयाला निर्भय खेडीकर या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणावर उद्या, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

याचिकेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. संचालनालयाने शासकीय व खासगी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांतील प्रवेशाकरिता २२ जून २०१६ रोजी अधिसूचना जारी केली होती. यानंतर १६ आॅगस्ट २०१६ रोजी निर्भयसह १४८ विद्यार्थ्यांचे ‘इन्फर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड सिस्टीम मेंटेनन्स’ या पदविका अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालय शुल्क, गणवेश शुल्क व इतर शैक्षणिक शुल्क संस्थेत जमा करण्यास सांगण्यात आले. तसेच, १८ आॅगस्टपासून वर्ग घेण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या अभ्यासक्रमात प्रवेश न मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी तक्रारी करून प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेतला. यामुळे संचालनालयाने वादग्रस्त आदेश जारी करून सर्व १४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले व नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेत. हा आदेश जारी करण्यापूर्वी कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. परिणामी वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा व नवीन प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्या निर्भयला दहावीत ६२ टक्के गुण असून त्याने प्रवेशाकरिता १४ आॅगस्ट २०१६ रोजी आॅनलाईन अर्ज सादर केला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. कार्तिक पटेल कामकाज पाहणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The dispute in the ITI High Court