अन् शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपुरातील कार्यक्रम केले रद्द; कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 11:28 AM2022-10-22T11:28:44+5:302022-10-22T11:32:24+5:30

कोराडी मंदिर व्यवस्थापनाने दिली 'ही' प्रतिक्रिया

Disgruntled Shankaracharya Swami Nishchalananda Saraswati canceled the program in Nagpur | अन् शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपुरातील कार्यक्रम केले रद्द; कारण काय?

अन् शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपुरातील कार्यक्रम केले रद्द; कारण काय?

Next

नागपूर : पुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा कोराडी मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम होता. मात्र अपेक्षित गर्दी जमविण्यात आयोजक कमी पडले. यामुळे नाराज झालेल्या शंकराचार्यांनी कार्यक्रमच रद्द केला. तथापि, शंकराचार्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कारण आयोजकांकडून सांगितले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, शंकराचार्यांशी संबंधित असलेल्या आदित्य वाहिनी या संघटनेच्या वतीने गुरुवार २० आणि शुक्रवार २१ ऑक्टोबरला श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर, कोराडी येथे पुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आदित्य वाहिनीचा विस्तार येथेही व्हावा हा या आयोजनामागील हेतू होता. शंकराचार्यांना निमंत्रण देताना या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात गुरुवारी सायंकाळच्या कार्यक्रमात फक्त २०० लोकांची उपस्थिती पाहून शंकराचार्य नाराज झाले. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमासोबतच शहरातील अन्य कार्यक्रमही रद्द केले.

दरम्यान, कोराडी मंदिर व्यवस्थापनाने या संदर्भात प्रतिक्रिया देताना, आपण आदित्य वाहिनीला कार्यक्रमासाठी फक्त मंदिर उपलब्ध करून दिले होते. या आयोजनासोबत प्रत्यक्षात कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. कार्यक्रमानंतर शंकराचार्य रात्री मंदिरात थांबणार होते. मात्र येथे वैद्यकीय सुविधा नसल्याने आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते अभ्यंकर रोड, सीताबर्डी परिसरातील आपल्या एका भक्ताकडे मुक्कामी थांबल्याचेही सांगण्यात आले. शंकराचार्यांच्या निकटवर्ती सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चांगलीच होती. मात्र आयोजकांनी केलेल्या नियोजनावर नाराज होऊन त्यांनी कार्यक्रम रद्द केले. 

Web Title: Disgruntled Shankaracharya Swami Nishchalananda Saraswati canceled the program in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.