नागपुरात डिसेंबर महिना ठरला सर्वात प्रदूषित ! नागरिकांना श्वास घेता येईना, राज्यातील तीन प्रदूषित शहरांमध्ये येते नाव
By निशांत वानखेडे | Updated: January 1, 2026 19:44 IST2026-01-01T19:42:53+5:302026-01-01T19:44:11+5:30
Nagpur : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे.

December has become the most polluted month in Nagpur! Citizens cannot breathe, name comes in three polluted cities in the state
नागपूर : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे. त्यातही महाल क्षेत्रातील नागरिकांसाठी समाेर येणारी स्थिती चिंता वाढविणारी आहे. २४ तासापूर्वी मावळलेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात महाल भागात सर्व ३१ दिवस हवा प्रदूषित हाेती, त्यामुळे श्वास घेणे धाेकादायक ठरले आहे.
पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी सांगितले, नागपूर शहर राज्याच्या व केंद्राच्या प्रदूषित शहरांच्या यादीत आले आहे. राज्यात पहिल्या तीन प्रदूषित शहरात उपराजधानीचा समावेश आहे. या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. शहरालगतचे दाेन्ही औष्णिक वीज केंद्र, दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या व त्यातून निघणारा धुर, घरगुती कोळसा ज्वलन, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, औद्याेगिकरण आणि माेठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम या कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून स्पष्ट हाेते.
हिवाळ्यात थंडीमुळे वारे संथपणे वाहतात, ज्यामुळे प्रदूषके वाहून न जाता, एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांचा त्रास वाढताे, तसेच नव्याने श्वसनाचे आजार वाढू शकतात. दमा, ब्रॉंकायटिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक आजारही बळावले असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे.
चार केंद्रांची स्थिती
- महाल क्षेत्रात डिसेंबरच्या ३१ पैकी ३१ दिवस प्रदूषण होते. हे महिन्यातील सर्वाधिक नाेंद आहे. यात ३० दिवस मध्यम, तर एक दिवस प्रदूषणाची स्थिती वाईट आहे.
- जीपीओ केंद्रावर ३१ दिवसांपैकी २७ दिवस प्रदूषित आढळले. ४ दिवस समाधानकारक, २६ दिवस प्रदूषित, तर १ दिवस जास्त प्रदूषित आढळले.
- रामनगर येथे ३१ पैकी २५ दिवस प्रदूषित आढळले. त्यात ६ दिवस समाधानकारक, २४ दिवस प्रदूषित, तर १ दिवस जास्त प्रदूषित आढळले.
- अंबाझरी येथे २२ दिवस प्रदूषित आढळले. त्यात ९ दिवस समाधानकारक, २० दिवस प्रदूषित तर २ दिवस जास्त प्रदूषित आढळले.
धुलीकणांचे प्रदूषण सर्वाधिक
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी ३, तर जास्तीत जास्त ८ प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण (पीएम २.५ व पीएम-१०), ओझोन, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड, अमोनिया, लेड या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. नागपूर शहर धुलीकणांमुळे सर्वाधिक प्रभावित आहे. पीएम-२.५ चे प्रमाण २५ दिवस वाढले आहे, ज्याचा अर्थ वाहनांचे प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे प्रा. चाेपणे यांनी सांगितले. यावर नियंत्रणासाठी वृक्षाराेपण, सायकलचा अधिकाधिक वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर व ई-वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.