पावणेदोन कोटी जप्त

By Admin | Updated: April 6, 2016 03:04 IST2016-04-06T03:04:44+5:302016-04-06T03:04:44+5:30

शिवनी (मध्य प्रदेश) येथून नागपुरात आलेली पावणेदोन कोटींची हवाला रक्कम गणेशपेठ पोलिसांनी जप्त केली.

Crores of rupees were seized | पावणेदोन कोटी जप्त

पावणेदोन कोटी जप्त

आॅटोत सापडल्या बॅग : हवाला व्यावसायिकांत खळबळ
नागपूर : शिवनी (मध्य प्रदेश) येथून नागपुरात आलेली पावणेदोन कोटींची हवाला रक्कम गणेशपेठ पोलिसांनी जप्त केली. ही रोकड घेऊन येणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
गणेशपेठ पोलिसांचे एक पथक मंगळवारी दुपारी ४ वाजता आग्याराम देवी चौकाजवळ नाकाबंदी करीत होते. तेथून जाणाऱ्या एका आॅटोत बसलेल्या दोघांचा संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी केली. दोघेही घाबरल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी आॅटोतील बॅग तपासल्या असता त्यात खच्चून नोटांचे बंडल दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांसह आॅटोचालकाला गणेशपेठ ठाण्यात नेले. तेथे विचारपूस केली असता आरोपींनी आपली नावे यासिन मुश्ताक खान (वय ५०) तसेच आशिष कैलास टिक्कस (वय १८) सांगितली. हे दोघेही शिवनीचे रहिवासी आहेत. त्यांनी ही रक्कम आपण इतवारीतील एका व्यावसायिकाकडे नेऊन देणार होतो, अशी माहिती सांगितली. लच्छू ऊर्फ लछमनदास नामक व्यक्तीने ही रोकड आपल्याला पोहोचविण्याची जबाबदारी दिली होती, असेही तो म्हणाला.
वर्धमाननगर, इतवारी भागात हवालाचे मोठे सेंटर असून, येथून रोजच कोट्यवधींची रक्कम इकडून तिकडे केली जाते. यासिन आणि आशिष हे ‘कुरियर बॉय’ नवीन असल्यामुळे ते पोलिसांना पाहून घाबरले आणि ही रोकड पोलिसांच्या हाती लागली.
दरम्यान, पोलिसांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानुसार उपायुक्त अभिनाश कुमार यांनी ठाण्यात भेट दिली. मशीन बोलवून नोटा मोजल्या असता त्या १ कोटी ७० लाख रुपये निघाल्या.
पोलिसांनी लगेच प्राप्तिकर विभागाला माहिती देऊन बोलवून घेतले. आरोपी यासिन आणि आशिषला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Crores of rupees were seized