Corona symptoms can also appear in the brain | कोरोनाची लक्षणे मेंदूतही दिसू शकतात

कोरोनाची लक्षणे मेंदूतही दिसू शकतात

ठळक मुद्देअमेरिकेचे तज्ज्ञ नाथ यांनी मेश्राम यांच्याशी साधला संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : कोरोना रुग्णामध्ये प्रामुख्याने ताप, कोरडा खोकला आणि श्वास लागण्याची लक्षणे दिसून येतात. परंतु यापूर्वी मेंदूमध्ये काही लक्षणे दिसून येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मेंदू संसर्ग विभागाचे प्रमुख डॉ. अविन्द्र नाथ यांनी आज भारतातील मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्याशी व इतरांशीही ऑनलाईनवरून संपर्क साधला असता ही माहिती दिली. डॉ. नाथ म्हणाले, ‘स्मॉल पॉक्स’, इन्फ्लूएन्जा, प्लेग, स्वाईन फ्लू यांसारख्या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला प्रभावित केले होते. १९१८मध्ये आलेला ‘फ्लू’ हा मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक होता. त्या काळात जगातील २५ टक्के लोक या रोगाने प्रभावित झाले होते आणि पाच कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर साधारण १०० वर्षांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. डॉ. नाथ यांनी नमूद केले की, कोरोनामध्ये चक्कर येणे, डोकेदुखी, चेतना कमी होणे, पक्षाघात, चालताना तोल जाणे, मेदूज्वर, मिरगी येणे आदी लक्षणेही दिसून येऊ शकतात. उदासीनता, घाबरणे, धडधडणे, चिडचीड होणे, भास होणे आदी मानसिक त्रासही होतो. या शिवाय, वास-गंध न येणे, चव गमावणे, स्रायूच्या दुखापतीचा त्रास होणे ही लक्षणेसुद्धा दिसून येतात. काही मेंदूचे आजार जसे पक्षाघात हा न्युमोनिया होण्यापूर्वी येऊ शकतो. यामुळे याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णामध्ये मेंदूच्या सभोवती असलेल्या द्रव्यामध्ये कोरोनाचे विषाणू दिसून आलेत. प्राण्यांवरील संशोधनात असे दिसून आले की, नाकाद्वारे विषाणू मेंदूमध्ये आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात.
कोरोनावर तीन हजारावर संशोधने सुरू
कोरोनावर उपचार शोधण्याकरिता सध्या जगात साधारण तीन हजार संशोधने सुरू आहेत. सध्यातरी कोरोनावर उपचार नाहीत. काही रुग्णांना त्रास कमी असतो आणि ते स्वत: बरेही होतात. प्रतिबंधक लसीची चाचणी सुरू आहे. परंतु रुग्णसेवेत यायला आणखी बराच कालावधी आहे. यामुळे प्रत्येकाने शासनाच्या सूचनांचे पालन करावे. घरीच थांबल्यास व इतरांपासून दूर राहिल्यास या रोगाला दूर ठेवणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Corona symptoms can also appear in the brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.