पहिल्या टप्प्यात १७८०० कर्मचाऱ्यांनाच कोरोना डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST2021-01-16T04:09:48+5:302021-01-16T04:09:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना लसीकरणाला शनिवार १६ जानेवारीपासून शहर व जिल्ह्यातील १२ केंद्रावर सुरुवात होत आहे. ...

Corona dose to 17,800 employees in the first phase | पहिल्या टप्प्यात १७८०० कर्मचाऱ्यांनाच कोरोना डोज

पहिल्या टप्प्यात १७८०० कर्मचाऱ्यांनाच कोरोना डोज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना लसीकरणाला शनिवार १६ जानेवारीपासून शहर व जिल्ह्यातील १२ केंद्रावर सुरुवात होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी ४२ हजार कोरोना डोज उपलब्ध झाले आहेत तर ३६ हजार १४५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनाच चार आठवड्यानंतर लसीचा दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील १० हजार तर ग्रामीण मधील ७ हजार ८०० अशा एकूण १७ हजार ८०० आरोग्य कर्मचाऱ्यांनाच ही लस दिली जाणार आहे.

जिल्ह्यासाठी ४२ हजार डोज प्राप्त झाले असले तरी यातील १० टक्के डोज अतिरिक्त ठेवण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री रेफ्रिजरेटर कंटेनर घेऊन कोरोनाचे डोस नागपुरात पोहोचले. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी तब्बल १ लाख १४ हजार लसींचे डोस यात होते. हा कंटेनर अकोला येथून रात्री २.४५ वाजता नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात पोहोचला. येथून पहाटेच ४.१५ वाजेपर्यंत नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात त्याचे वितरण करण्यात आले. नागपूर जिल्ह्याला ४२ हजार, गोंदिया १० हजार, भंडारा ९५००, चंद्रपूर २० हजार, गडचिरोली १२ हजार, वर्धा २०,५०० डोजेस देण्यात आले आहेत. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटची ही व्हॅक्सिन असून ती आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

बॉक्स....

जिल्ह्यात १२ लसीकरण केंद्र

नागपूर जिल्ह्यात १२ केंद्र राहणार आहेत. त्यामध्ये नागपूर महानगर क्षेत्रातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांचा समावेश आहे. शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा माहिला रुग्णालय, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाल येथील डायग्नोसिस सेंटर येथे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामटेक, कामठी, ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरीचा समावेश आहे.

‘व्हॅक्सिन’ घेतल्यावरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी

प्रत्येक रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही ‘व्हॅक्सिन’ देण्यात येणार आहे परंतु ‘व्हॅक्सिन’ घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण दुसऱ्याच दिवशी अँटीबॉडी तयार होत नाही. त्यामुळे आरोग्य डॉक्टर, नर्स, व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात धुणे हे कटाक्षाने सुरू ठेवावे

डॉ. संजय जायस्वाल

आरोग्य उपसंचालक, नागपूर विभाग

Web Title: Corona dose to 17,800 employees in the first phase