संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:34 AM2019-11-26T10:34:06+5:302019-11-26T10:35:39+5:30

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण संविधान दिनाचा पाया हा नागपूर जिल्हा परिषदेतून रुजविण्यात आला. त्याचे शिल्पकार ठरले, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे.

Constitution Day special: craftsman e. Z. Khobragade | संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे

संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे

googlenewsNext
ठळक मुद्दे‘जि. प.’ने रचला संविधान दिनाचा पाया

मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण संविधान दिनाचा पाया हा नागपूर जिल्हा परिषदेतून रुजविण्यात आला. त्याचे शिल्पकार ठरले, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला अर्पण केले. या देशाचा राज्यकारभार, शासकीय प्रशासकीय यंत्रणा ज्या संविधानावर चालते त्याची ओळख २००५ पर्यंत कुणालाही नव्हती. संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ आहे. त्यामुळे संविधानाची ओळख प्रत्येक भारतीय नागरिकांना माहीत असणे ही भावना जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या मनात आली. त्यांनी सीईओंच्या अधिकाराचा वापर करून जिल्हा परिषदेची यंत्रणा हाताशी घेऊन ३ डिसेंबर २००५ पासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सुरू केले. शाळांमध्ये दैनिक परिपाठाच्या वेळी दररोज संविधानाचे वाचन हा उपक्रम सुरू करण्यात आला. शाळांच्या इमारतीच्या दर्शनी भागात संविधानाच्या प्रास्ताविका लावण्यात आली. ई.झेड. खोब्रागडे यांनीसुद्धा आपल्या कार्यालयात संविधानाची प्रास्ताविका दर्शनी भागावर लावली. त्यांनी या उपक्रमाची माहिती शासनाच्या विविध विभागांनाही दिली. काही कारणास्तव हा उपक्रम इतर जिल्ह्यात सुरू होऊ शकला नाही. पण आदिवासी विभागाने ९ मार्च २००६ पासून विभागाच्या सर्व आश्रमशाळेत परिपाठाच्या तासाला संविधानाचे वाचन सुरू केले.
पुढे ई. झेड. खोब्रागडे हे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. संविधान ओळख हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी वर्धा जिल्ह्यात राबविला. तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके हे वर्ध्याचे पालकमंत्री होते. त्यांनाही खोब्रागडे यांनी विनंती केली. १४ जून २००७ च्या पत्रान्वये हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये २००८ च्या सत्रापासून सुरू केला. समाजकल्याण विभागाचे संचालक असताना खोब्रागडे यांनी सर्व वसतिगृहात संविधान ओळख हा उपक्रम सुरू केला.

राज्य सरकारने २००८ पासून लागू केला संविधान दिन
त्यानंतर ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधानाची प्रास्ताविका सर्व शाळेसोबतच सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायती आदी ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात यावे, ग्रामसभा, जि.प., नगरपालिका, महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व्हावे, राष्ट्रीय सण व शासकीय समारंभात वाचन व्हावे, अशी मागणी शासनाला केली. भारताच्या संविधानाचा हा उपक्रम आत्मसन्मानाचा, अस्तित्वाचा आणि अस्मितेचा आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.

२०१५ मध्ये केंद्र सरकारने दिली मंजुरी
ई. झेड. खोब्रागडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संविधान दिन साजरा करण्यात यावा यासंदर्भात पत्र पाठविले. केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन २०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून संविधान दिवस साजरा करण्याला मंजुरी दिली. तेव्हापासून संविधान दिन सरकारी कार्यालयात साजरा करणे हे बंधनकारक झाले आहे.

समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तींची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता वृद्धिंगत करणारे भारताचे संविधान आहे. हा जगातील सर्वात सुंदर राष्ट्रग्रंथ आहे. म्हणून प्रत्येक भारतीयास माहिती असण्याच्या दृष्टिकोनातून शालेय जीवनातून प्रास्ताविकेच्या माध्यमातून ती रुजविण्यात आली. या संकल्पनेला राज्य आणि केंद्र सरकारने मान्य केले आणि २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आनंद आहे.
- ई. झेड. खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी

Web Title: Constitution Day special: craftsman e. Z. Khobragade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.