कॉंग्रेस उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्येतील आरोपीला नागपुरातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 22:53 IST2026-04-23T22:51:07+5:302026-04-23T22:53:19+5:30
अकोल्यातील अकोट तालुक्यात झाली होती हत्या : रवीभवनात जेवायला आला आणि अडकला

कॉंग्रेस उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्येतील आरोपीला नागपुरातून अटक
योगेश पांडे
नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्येतील एका आरोपीला नागपुरातून नाट्यमयरित्या अटक करण्यात आली. आरोपी रवीभवन परिसरात गुरुवारी दुपारी जेवणासाठी आला होता व अकोटमधीलच काही लोकांनी त्याला ओळखले. त्यानंतर त्याला पकडण्यात आले. सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले व त्याला अकोट ग्रामीणच्या पथकाच्या हवाली केले आहे.
६ जानेवारी रोजी हिदायत पटेल यांच्यावर अकोल्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हल्ला झाला होता. ते गावातील मशीदीतून नमाजनंतर बाहेर आल्यावर उबेद पटेल या तरुणाने त्यांच्यावर हल्ला करत वार केले होते. पटेल यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. उबेदला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात काही राजकीय पदाधिकारीदेखील आरोपी होते. अकोला जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व जिल्हा परिषदेचा माजी कृषी सभापती असलेला राजू बोचे हादेखील आरोपी होता व तो फरार होता.
गुरुवारी दुपारी तो रवीभवन परिसरात जेवणासाठी गेला. अकोट तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्ते त्यावेळी त्याच परिसरात होते. त्यांनी राजूला ओळखले व त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यांच्यात झटापट झाली व राजूनेदेखील त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्याला चोप दिला व पोलिसांना फोन केला. सदर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तेथे पोहोचले व राजूला ताब्यात घेतले. पोलिसांनी अकोट ग्रामीणच्या पथकाला या प्रकाराची माहिती दिली. तेथील पथक सायंकाळी नागपुरात पोहोचले व त्याला त्यांच्या हवाली करण्यात आले.