शताब्दी वर्षात संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला ‘बूस्टर डोस’

By योगेश पांडे | Updated: May 4, 2026 23:56 IST2026-05-04T23:55:17+5:302026-05-04T23:56:21+5:30

घराघरात पोहोचलेले ‘जागरण’, लाखो स्वयंसेवकांची फौज आणि मतदानावर केंद्रित रणनीती ठरली निर्णायक

bjp gets booster dose in west bengal election 2026 due to rss meticulous planning in centenary year | शताब्दी वर्षात संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला ‘बूस्टर डोस’

शताब्दी वर्षात संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला ‘बूस्टर डोस’

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पश्चिम बंगालच्या राजकारणात यंदाची निवडणूक मैलाचा दगड ठरली असून भारतीय जनता पक्षाने प्रथमच राज्यात मोठे यश मिळविले आहे. विशेष म्हणजे देशाच्या क्रांतीच्या लढ्यात महत्वाचे केंद्र असलेल्या या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांतच भाजपची सत्ता येणे ही ऐतिहासिक बाब मानण्यात येत आहे. या अभूतपूर्व यशाचा पाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचला असून मागील काही वर्षांत राबविलेल्या व्यापक, बहुआयामी आणि अत्यंत सूक्ष्म नियोजनाचे फळ मिळाले आहे. एकीकडे भाजपकडून मोठ्या सभा, भव्य प्रचारयंत्रणा आणि आक्रमक राजकीय भाषणांवर भर देण्यात येत होता, तर दुसरीकडे संघाने शांत, सातत्यपूर्ण आणि तळागाळासोबतच बंगालमधील ‘भद्र’ लोकांशी संपर्कावर भर देत एक वेगळीच रणनीती अवलंबली. हीच दुहेरी रणनिती भाजपसाठी ‘गेमचेंजर’ ठरली.

गेल्या काही वर्षांत बंगालमध्ये संघटनेचा विस्तारही लक्षणीय झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी पाचशेच्या आसपास मर्यादित असलेली शाखांची संख्या आता चार हजारांहून अधिक झाली आहे. याशिवाय, संघ परिवारातील विविध घटकांनी—विद्यार्थी, कामगार आणि सीमावर्ती भागातील संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय, भाजपमधील अंतर्गत मतभेद मिटविण्यातही संघाने महत्त्वाची भूमिका बजावली. मागील निवडणुकीत दिसून आलेली गटबाजी लक्षात घेता, यावेळी समन्वय बैठका घेऊन विविध गटांमध्ये संवाद साधण्यात आला. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्यात एकसंधता निर्माण झाली.

स्वयंसेवकांकडून पावणेदोन लाखांहून अधिक लहान मोठ्या बैठका

संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील संपूर्ण मोहिमेचा केंद्रबिंदू ठरला तो ‘जागरण’ उपक्रम. संघाच्या स्वयंसेवकांनी राज्यभरात सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक लहान-मोठ्या बैठका घेतल्या. चहाच्या टपऱ्या, मंदिरांचे प्रांगण, घरगुती गाठीभेटी आणि स्थानिक पातळीवरील संवाद या माध्यमांतून मतदारांशी थेट संपर्क साधण्यात आला. या बैठकींमध्ये कोणत्याही पक्षाचे थेट समर्थन न करता समाजातील सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि नागरिक म्हणून जबाबदाऱ्या यांवर भर देण्यात आला. त्यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारची वैचारिक जाणीव निर्माण झाली.

धार्मिक-सामाजिक संस्थांना जोडले

या निवडणुकीत धार्मिक आणि सामाजिक संस्थांची साथही संघाला मिळाली. अनेक आश्रम, साधू-संत आणि धार्मिक नेत्यांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याने समाजातील विविध स्तरांपर्यंत संदेश पोहोचवणे अधिक सुलभ झाले. उत्तर बंगालमध्ये संघाने दीर्घकालीन सामाजिक उपक्रमांवर भर दिला. चहा मळे आणि आदिवासी भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक विकासाशी संबंधित कामांमुळे समाजात विश्वासार्हता वाढली. या कामाचा राजकीय परिणामही निवडणुकीत दिसून आल्याचे मानले जाते.

मतदानवाढीच्या मोहीमेत मोलाचा वाटा

यंदा पश्चिम बंगालच्या निवडणूकीत ऐतिहासिक ९१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. बंगालमध्ये फारसे मतदानाला बाहेर न पडणारे ‘भद्र’ म्हणजेच पांढरपेशा लोकांपर्यंतदेखील संघाचे स्वयंसेवक पोहोचले. मतदान करण्याबाबत संघाकडून मोठी जागृती करण्यात आली व त्याचा फायदा भाजपला झाला. मतदान हा केवळ राजकीय कृती न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

Web Title : शताब्दी वर्ष में आरएसएस की योजना से पश्चिम बंगाल में भाजपा को बढ़ावा।

Web Summary : आरएसएस की रणनीतिक योजना ने पश्चिम बंगाल में भाजपा की सफलता को बढ़ावा दिया। व्यापक जमीनी स्तर पर पहुंच, सांस्कृतिक पहचान पर ध्यान केंद्रित करना और पार्टी के भीतर समन्वय प्रयासों महत्वपूर्ण साबित हुए। विशेष रूप से मध्यम वर्ग के बीच मतदान में वृद्धि से भाजपा को काफी लाभ हुआ।

Web Title : RSS planning boosts BJP in West Bengal during centenary year.

Web Summary : RSS's strategic planning propelled BJP's success in West Bengal. Extensive grassroots outreach, focus on cultural identity, and coordination efforts within the party proved crucial. Increased voter turnout, especially among the middle class, significantly benefited BJP.