भंडारा-गोंदिया, पुसदला वादळाचा तडाखा

By Admin | Updated: June 13, 2014 01:27 IST2014-06-13T01:27:05+5:302014-06-13T01:27:05+5:30

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात झालेल्या वादळी पावसादरम्यान घरांच्या छतावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली

Bhandara-Gondiya, Pusad to hit the storm | भंडारा-गोंदिया, पुसदला वादळाचा तडाखा

भंडारा-गोंदिया, पुसदला वादळाचा तडाखा

भंडारा/गोंदिया/पुसद : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात झालेल्या वादळी पावसादरम्यान घरांच्या छतावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांबेसुद्धा कोलमडून पडली आहेत. याशिवाय मळणी केलेली उन्हाळी धानाची पोती भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लाखांदूर तालुक्यातील ३५ गावातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कऱ्हांडला येथील गिरीश मेश्राम यांच्या राईस मिलचे गोदाम भुईसपाट झाले आहे. गोदाम परिसरातील भिंत प्रभाकर मेश्राम यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कोसळले. या पावसामुळे १६ टन तांदळाचा चुराडा झाला. यासह ३५ गावातील नुकसान कोट्यवधीत झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात कवलेवाडा येथे पाच घरे अंशत: पडली असून त्यात २७ हजार तर तीन गोठे पडल्याने दोन लाख ७७ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. इसाटोला येथे १९ घरे अंशत: पडली असून त्यात ६५ हजार रूपयांचे तर दोन गोठे पडून ५८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर सहारवानी येथे २५ घरे अंशत: पडली असून यात एक लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
पुसद शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमिनदोस्त झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंद झाली होती. पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. यातून नगरपरिषदेने केलेले पावसाळ्यापूर्वीचे नियोजन पार कोलमडल्याचे दिसून आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Bhandara-Gondiya, Pusad to hit the storm