अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस

By आनंद डेकाटे | Published: October 18, 2023 03:36 PM2023-10-18T15:36:35+5:302023-10-18T15:37:50+5:30

आंबेडकरी समाजाच्या २७२ दिवसांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश, आंदोलन स्थगित

At Ambazari, Dr. Babasaheb Ambedkar Cultural Bhavan will be constructed by the State Government - Dy CM Devendra Fadnavis | अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस

अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : अंबाझरी येथे राज्य शासनाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल, तसेच या जागेवरील खासगी प्रकल्पाच्या कामास स्थगितीच्या निर्णयावर कायम असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.

अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या आंदोलनाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी भेट दिली. तसेच, कृति समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर उपरोक्त आश्वासन दिले. अशाप्रकारे आंबेडकरी समाजाच्या या ऐतिहासिक आंदोलनाला यश आले. आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी कृति समितीच्या प्रमुख सरोज आगलावे, सरोज डांगे, सुगंधा खांडेकर, ज्योती आवळे, पुष्पा बौद्ध, सुषमा कळमकर, तक्षशिला वाघदरे, उषा बौद्ध, माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये आदी सदस्य यांच्यासह आमदार विकास ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.

अंबाझरी येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शासनाच्यावतीने बांधण्यात येणार असून या जागेवरील खाजगी प्रकल्प रद्द करण्यात येणार आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात कोणती त्रुटी राहून नये यासाठी राज्याचे महाधिवक्ता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

या प्रकल्पाला राज्य शासनाने याआधीच स्थगिती दिली आहे. या संदर्भात लेखी आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृति समितीला देण्यात येईल, कृती समितीतर्फे २७२ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन स्थगित करावे,अशी विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये आलो असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कृति समितीने आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर केले.

अंबाझरी येथील उद्यानात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल व लवकरच हे उद्यान जनतेसाठी खुले करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सरोज आगलावे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कृति समितीतर्फे सुरु असलेल्या आंदोलना संदर्भात माहिती दिली.तसेच, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल आभार मानले. आमदार विकास ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: At Ambazari, Dr. Babasaheb Ambedkar Cultural Bhavan will be constructed by the State Government - Dy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.