मुलींच्या तस्करीचे आरोप पण एकही तक्रार पोलिसांकडे नाही; वायरल ऑडिओ क्लिपमुळे राळेगावमध्ये दुसऱ्या दिवशीही तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:00 IST2026-04-21T14:58:18+5:302026-04-21T15:00:17+5:30
Nagpur : तालुक्यातील ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहाण यांनी केला. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप त्यांनी पोलिसांना दिली.

Allegations of trafficking of girls but no complaint with the police; Tension in Ralegaon continues for the second day due to viral audio clip
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहाण यांनी केला. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप त्यांनी पोलिसांना दिली. शनिवारपासून (दि. १८) हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर रविवारी राळेगाव पोलिस ठाण्यावर मोठा जमाव गोळा झाला. हीच तणावाची स्थिती सोमवारी कायम होती. संपूर्ण शहरात बंद पाळण्यात आला, तर हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून टायर जाळत घटनेचा निषेध केला.
आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांचा मतदारसंघ असलेल्या राळेगाव परिसरातून सहा महिन्यांत आदिवासी समाजातील ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण भाजप जिल्हाध्यक्षांनी उचलून धरले आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून एका दाम्पत्याला ताब्यात घेतले. संशयितांनी अतिक्रमित केलेल्या जागेवरील झोपडीही रविवारी पाडण्यात आली. त्यानंतरही राळेगाव शहरात तणावाचे वातावरण कायम आहे.
मुलींचे धर्मांतरण, लव जिहाद व तस्करी झाल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे अशी एकही तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील नेमके सत्य काय याचा शोध पोलिस घेत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण केला जात आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. दरम्यान, रविवारी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याची तक्रार महिला व बालकल्याण अधिकाऱ्याने दिली होती. त्या प्रकरणात मुलीच्या आई, बहिणीसह चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
मात्र, त्या प्रकरणाचा भाजप जिल्हाध्यक्ष ३ आरोप करत असलेल्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले. एकूण या प्रकरणाची गुंतागुंत कायम असून, वास्तव काय आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.