निवडणुकीनंतर राजकीय सामाजिक विचारशून्यताच

By Admin | Updated: May 26, 2014 01:09 IST2014-05-26T01:09:35+5:302014-05-26T01:09:35+5:30

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सांप्रदायिक चेहरा नव्हता पण तो छुप्या पद्धतीने होताच. मतदारांना ही सांप्रदायिकता ओळखता आली नाही. त्यात पुरोगामी चळवळींमध्ये आलेला हेकेखोरपणा, नेतृत्वाची

After the election, political social thoughtlessness | निवडणुकीनंतर राजकीय सामाजिक विचारशून्यताच

निवडणुकीनंतर राजकीय सामाजिक विचारशून्यताच

परिसंवादातील सूर : निवडणुकीनंतरचे वास्तव विषयावर चर्चा

नागपूर : यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सांप्रदायिक चेहरा नव्हता पण तो छुप्या पद्धतीने होताच. मतदारांना ही सांप्रदायिकता ओळखता आली नाही. त्यात पुरोगामी चळवळींमध्ये आलेला हेकेखोरपणा, नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा आणि चळवळींचे विभागलेपण नागरिकांना विखुरणारे ठरले. चळवळींच्या या गटातटातला परस्पर संवाद संपला. त्यामुळेच चळवळी ज्या विचारांवर निष्ठा ठेवून मोठय़ा झाल्या, त्यातला विचार क्षीण होत गेला. दुसरीकडे गेल्या २0 वर्षापासून काहींनी मात्र सातत्याने आणि निष्ठेने त्यांच्या चळवळीचा प्रसार केला. यात चळवळींच्या वैचारिकतेत उणीव निर्माण झाली. काँग्रेसने राबविलेली धोरणे तळागाळात पोहोचलीच नाहीत. परिणामी लोकांमध्ये राग निर्माण झाला आणि मोदी सरकार सत्तेवर आले. या निवडणुकीनंतर राजकीय, सामाजिक विचारशून्यताच दिसत असल्याचे मत साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंतांनी व्यक्त केले.

धरमपेठ राजाराम वाचनालय आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणुकीनंतरचे वास्तव विषयावर एका परिचर्चेचे आयोजन राजाराम वाचनालय, गोकुळपेठ येथे करण्यात आले. या चर्चेचे समन्वयन आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. याप्रसंगी डॉ. जोशी म्हणाले, लोहियांच्या विचारांचाच हा विजय आहे. काँग्रेसमुक्त शासनाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते पण हे शासन भांडवलवादी यावे, हे त्यांना अपेक्षित नव्हते. गेली काही वर्षे भाजप आणि संघटनांनी ज्या निष्ठेने स्वत:च्या विचारांचा प्रसार केला तसा कुणीच केला नाही. त्याचीच ही परिणती आहे. यात सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहणार्‍या सर्व पक्षांचा पराभव झाला. एण्ड ऑफ आयडियालॉजीसध्या झाली आहे. मार्क्‍सवाद, साम्यवाद, समाजवाद संपला आहे. निवडून येणार्‍यांनी विचारधारेच्या आधारावर निवडणूक जिंकली नाही. त्यात काँग्रेस सरकारमध्ये ज्यांना काही मिळाले नाही त्यांना ओरबाडून का होईना पण सेवक बदलून काहीतरी मिळविण्याची वृत्ती निर्माण झाली. हा परिणाम त्याचाच आहे. ही स्थिती बदलण्यासाठी विचारवंतांनाच काम करावे लागेल, असे ते म्हणाले. जम्मू आनंद म्हणाले, सांप्रदायिकता न दाखविता सांप्रदायिक विचारांचेच लोक निवडून आले. भ्रष्टाचाराचे आंदोलन वगळता या देशात अनेक मोठी आंदोलने झालीत पण ती शासनाला प्रभावित करू शकली नाहीत. साहित्यिक आणि कलावंतांनी अपवाद वगळता थेट भूमिका घेतली नाही. ही विचारशून्यताच म्हणावी लागेल, असे ते म्हणाले.

अरुण वनकर म्हणाले, मोदी सरकार आले. आता त्यांना हवे तसे संविधान बदलविण्याची भाषा होत आहे. चळवळींना आपला विचार योग्य पद्धतीने पोहोचविता आला नाही, याचाच हा परिणाम आहे. सांस्कृतिक आघाडीसारखे प्रयोग देशभर व्हायला हवेत, असे ते म्हणाले. विलास भोंगाडे यांनी पुरोगामी चळवळींचा संवाद संपल्यामुळेच हा परिणास झाला, असे सांगितले. इ. मो. नारनवरे म्हणाले, मोदींची आक्रमकता आणि खोटा विचारही सांगण्याची पद्धत लोकांना भावली.

निवडणुकीपूर्वी त्यांचा वेगळा चेहरा आणि आता सेक्युलरवादी चेहरा यावर विश्‍वास कसा ठेवायचा. पण निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी सर्व तंत्रांचा योग्य उपयोग केला. या शक्तींना कुणीही सामूहिक विरोध केला नाही, याचा विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.

रुबिना पटेल म्हणाल्या मुस्लिमांना यंदा मोकळेपणाने बोलता आले नाही. निवडणुकीनंतर त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आली आहे. याप्रसंगी अनेकांनी परखडपणे आपले मुद्दे मांडले. यात सुरेश खैरनार, जयदीप हर्डीकर, रमेश जनबंधू, संगीता महाजन, अरुण लाटकर, गिरीश सहस्रबुद्धे, विलास सुखदेवे, विलास देशपांडे, विनोद लोकरे आणि अनिल चनाखेकर सहभागी झाले. (प्रतिनिधी)

निवडणुकीनंतरचे वास्तव विषयावर आयोजित परिचर्चेला उपस्थित मान्यवर.

Web Title: After the election, political social thoughtlessness