दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 01:57 IST2025-11-27T01:56:10+5:302025-11-27T01:57:29+5:30
‘डिजिटल अरेस्ट’ करत निर्माण केली दहशत...

दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : दिल्ली स्फोटाशी निगडीत मनी लॉंड्रिंग प्रकरणात नाव आल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका ७१ वर्षीय वृद्धाला टार्गेट केले. यामुळे दहशतीत आलेल्या संबंधित सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याकडून गुन्हेगारांनी २९ लाख रुपये उकळले. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधवननगर निवासी असलेल्या संबंधित वृद्धाला ११ नोव्हेंबर रोजी ८९२२०६३२३५ या क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. समोरील व्यक्तीने मुंबई पोलीस मुख्यालयातून उपनिरीक्षक सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. त्याने दिल्ली स्फोटाशी निगडीत मनी लॉंड्रिंगमध्ये वृद्धाचे नाव आल्याचा दावा केला. काही वेळाने आणखी एक व्हिडीओ कॉल आला व समोरील व्यक्तीने कॅमेरा सुरू ठेवण्यास सांगितले. जर सहकार्य केले नाही तर अटक करण्यात येईल अशी धमकी समोरील व्यक्तींनी दिली.
२१ नोव्हेंबरपर्यंत सातत्याने पती-पत्नीच्या मोबाईल व्हिडीओ कॉल येत होते. आरोपी स्वत:ला दिल्ली-एनआयए तसेच लखनऊ एटीएसमधून बोलत असल्याचे सांगत होते. आरोपींनी वृद्धाकडून मालमत्तेचे सर्व तपशील मागून घेतले. भितीपोटी वृद्धाने त्यांना सर्व माहिती दिली. आरोपींनी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा बनावट अटक वॉरंट पाठविला. त्यानंतर आरोपींनी पैशांची मागणी केली. वृद्धाने एफडी मोडून आरोपींना २९.३० लाख रुपये पाठविले. मात्र त्यानंतरही आरोपी पैसे मागतच होते. वृद्धाने आता पैसे संपल्याचे सांगितले.
तेव्हा आरोपींनी त्यांना मालमत्ता किंवा पेंशनवर कर्ज घ्या असे उत्तर दिले. त्यानंतर आरोपींनी फोन करणे बंद केले. वृद्धाने फोन करून पैसे परत कधी मिळतील असे विचारले असता आरोपींनी २४ नोव्हेंबरला पैसे परत देऊ असे सांगितले. त्यांचे फोन बंद झाल्याने वृद्धाने सुटकेचा नि:श्वास घेतला व बाहेरगावी राहणाऱ्या मुलाला हा प्रकार सांगितला. आपल्या वडिलांसोबत फसवणूक झाल्याचे मुलाला लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्या खात्यात पैसे पाठविले त्याचा मनी ट्रेल काढून पोलीस आरोपींचा माग घेत आहेत.