काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:03 IST2025-07-17T18:39:11+5:302025-07-17T20:03:22+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे.

काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धाची परिणती बुधवारी एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात झाली होती. हा वाद शमण्यापूर्वीच आज विधिमंडळाच्या आवारात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळत असलेल्या सविस्तर माहितीनुसार विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तर तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मध्ये पडून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दूर केले.
आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच जोरदार हाणामारी#GopichandPadalkar#JitendraAwhadpic.twitter.com/iuCzBAcKfq
— Lokmat (@lokmat) July 17, 2025
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.