Congress Prithviraj Chavan News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सकारात्मक असले, तरी अजून दोन्ही प्रमुखांनी तशी घोषणा केलेली नाही. परंतु, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार, ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक विधान केले आहे.
राजकीयदृष्ट्या वेगळे झालेले दोन भाऊ पुन्हा एकत्र येत असतील, तर स्वागतच आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही ते एकत्र लढणार असतील, तर हीदेखील चांगली बाब आहे. एक पक्ष कमी होईल. परंतु, केवळ या निवडणुकीपुरता त्यांचा हा निर्णय असेल, तर माहिती नाही की, पुढे काय होईल. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील का, ठाकरे बंधूंचे पक्ष एकमेकांत विलीन झाले, तर त्याचे नेतृत्व कोण करणार? याबाबत जनतेला उत्सुकता आहे. विजय मेळावा घेणे, त्यासाठी एकत्र येणे चुकीचे नाही. परंतु, कोणत्याही पद्धतीच्या मारहाणीला आमचे समर्थन नाही. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि ती भंग होईल, याला आमचा पाठिंबा नसेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
...तर आम्ही ते स्वीकारणार नाही
काँग्रेस पक्षाची भूमिका अशी आहे की, आमची आघाडी इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचा गट आणि शरद पवारांचा गट सामील आहेत. जर त्यांना इतर कोणत्याही पक्षासोबत किंवा समान विचारसरणीच्या पक्षाशी युती करायची असेल तर, तो त्यांचा मुद्दा आहे. परंतु, जर आघाडीतील घटक पक्षांना अशा लोकांसोबत युती करायची असेल की, जे काँग्रेसच्या विचारसरणीला, धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलेल्या विचारसरणीला मूलभूतपणे विरोध करतात, तर आम्ही ते स्वीकारणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. जर पक्षाने मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवल्या होत्या. परंतु, आता राज ठाकरे यांचा आगामी महापालिका निवडणुकीत प्रवेश महाविकास आघाडीचे भविष्य कसे ठरवतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.