Will Corona extend the 10th-XII result? | दहावी - बारावीचा निकाल कोरोना लांबवणार? उत्तरपत्रिका घरी आणण्यात शिक्षकांना अडचणी

दहावी - बारावीचा निकाल कोरोना लांबवणार? उत्तरपत्रिका घरी आणण्यात शिक्षकांना अडचणी

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी शिक्षक घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर केली जाऊ शकते कारवाई

पुणे : इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन घरी करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी शाळांमधून या उत्तरपत्रिका घरी आणण्यात शिक्षकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर मार्ग काढावा, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळाने केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. इयत्ता दहावीचा भूगोल विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. सध्या इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या सुरक्षेत ठेवण्यात आल्या आहेत. शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासणीचे काम करता येऊ शकेल, असा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र सध्या राज्यात संचारबंदी आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. परिणामी शिक्षकांना  शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन उत्तरपत्रिका घेता येत नाही. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांना उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी लांबण्याची शक्यता मुख्याध्यापक महामंडळाने व्यक्त केली आहे.

इयत्ता बारावीच्या सुमारे 60 टक्के उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत. बहुतांश शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या आहेत. मात्र, इयत्ता बारावीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे इयत्ता दहावीच्या केवळ 30 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. शिक्षक घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. उत्तर पत्रिका आणण्यास शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी शासनाने शिक्षकांना मुभा दिली तर उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत होऊ शकते. त्यासाठी राज्य मंडळाने याबाबत शासनाला पत्रव्यवहार करणे अपेक्षित आहे. असे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजय सिंह गायकवाड यांनी सांगितले.

.................
शिक्षकांना हवे पत्र
शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका आणण्यासाठी जाणार्‍या शिक्षक-मुख्याध्यापकांना पोलीसांकडून अडविले जात आहे. संचारबंदीनंतरच शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करावे, असे पोलिस सांगत आहेत. राज्य शासनाने शिक्षकांना उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठी परवानगी दिल्याचे कोणतेही पत्र नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यात लक्ष घालावे, यासाठी मुख्याध्यापक महामंडळ राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांच्याकडे पाठपुरावा करेल.
- विजयसिंह  गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will Corona extend the 10th-XII result?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.