"ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्रातील जनतेला...!"; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी खूश, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 03:32 IST2026-02-10T03:30:42+5:302026-02-10T03:32:02+5:30
महायुतीने जिंकलेल्या ५५२ जागांपैकी भाजपने २२५ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने १६५ तर शिवसेनेने १६२ जागा जिंकल्या.

"ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्रातील जनतेला...!"; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी खूश, काय म्हणाले?
महाराष्ट्रात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माहिती नुसार, महायुतीने 12 जिल्हा परिषदांमधील 731 जागांपैकी तब्बल 552 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
निवडणूक निकालासंदर्भात 'एक्स' पोस्ट करत मोदी म्हणाले, "पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो."
याशिवाय, "महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो," असेही मोदी यांनी लिहिले आहे.
पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे!
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2026
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला…
असे आहेत निकाल -
महायुतीने जिंकलेल्या ५५२ जागांपैकी भाजपने २२५ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने १६५ तर शिवसेनेने १६२ जागा जिंकल्या. विरोधी पक्षांचा विचार करता, महाविकास आघाडीचा (एमव्हीए) विचार करता, काँग्रेसने ५५ जागांसह आघाडी घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ४३ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २६ जागा जिंकता आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लातूर आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
या शिवाय, अपक्ष उमेदवारांनी वीस जागा जिंकल्या, तर राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांनी १४ जागा जिंकल्या तर नोंदणीकृत पक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत.