प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:39 IST2025-10-28T11:38:35+5:302025-10-28T11:39:13+5:30
Vasantdada Sugar Institute Inquiry: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या जमीन वापर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह. VSI चौकशीचा नेमका राजकीय वाद काय आहे, वाचा.

प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिला जाणारा राज्य सरकारचा अनुदानाचा पैसा व्यवस्थित वापरला जातो की नाही, संस्थेच्या मालमत्ता ऊस आणि साखरेच्या संशोधनासाठी वापरल्या जातात की इतर उद्योगधंद्यांना वापरल्या जातात याची चौकशी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कारभारावर शेतकरी नेत्यांकडून टीका होत होती. या संस्थेच्या चौकशीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. सोमवारी साखर उद्योगाच्या संदर्भात झालेल्या बैठकीत या संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेण्यात आले. या संस्थेला राज्यात जेवढे उसाचे गाळप होते, त्या प्रत्येक टनामागे एक रुपया बाजुला काढला जातो आणि तो अनुदान स्वरुपात दिला जातो. या पैशांच्या आर्थिक व्यवहारांवर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. याची चौकशी होणार असून दोन महिन्यांत हा अहवाल सरकारला दिला जाणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अत्यंत अल्प दरात भाडेपट्ट्यावर खूप मोठी जमीन आहे. तिचा वापर केवळ ऊस आणि साखर उद्योगासाठीच होतो का? यावर आक्षेप आहेत. शिवाय साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना संस्थेच्या संशोधनाचा काहीच फायदा होत नाहीय, अशी देखील टीका होत आहे. यामुळे संस्थेची कार्यपद्धती बदलण्याची आणि ती अधिक पारदर्शक करण्याची मागणी करण्यात येत आहे.