विद्रोही साहित्य संमेलनात शक्तिपीठ महामार्ग रद्दसह विविध ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:30 IST2026-05-11T13:29:23+5:302026-05-11T13:30:30+5:30
अध्यक्ष काॅ. धनाजी गुरव यांनी संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुकीत लक्ष घालावे लागेल, असे सांगून महाराष्ट्रात विद्रोहीचं वादळ घोंगावताना दिसेल, असा इशाराही दिला

विद्रोही साहित्य संमेलनात शक्तिपीठ महामार्ग रद्दसह विविध ठराव मंजूर
सातारा : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला आहे. कर्ज काढून मार्ग केला जातोय, तो रद्द करावा यासह किल्ले अजिंक्यताऱ्यावर छत्रपती शाहू महाराज (थोरले) आणि महाराणी ताराबाई यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभे करावे, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, यासह विविध ठराव विद्रोहीच्या संमेलनात एकमताने झाले. याचवेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष काॅ. धनाजी गुरव यांनी संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुकीत लक्ष घालावे लागेल, असे सांगून महाराष्ट्रात विद्रोहीचं वादळ घोंगावताना दिसेल, असा इशाराही दिला.
साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा समोराप रविवारी झाला. यामध्ये विविध मान्यवरांनी विचार मांडले. तसेच सर्वांच्या साक्षीने ठरावही मंजूर केले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत, माजी अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर, कवी वाहरु सोनवणे, सह स्वागताध्यक्ष सुहास महाराज फडतरे, काॅ. धनाजी गुरव, अविनाश कदम, ॲड. वर्षा देशपांडे, डाॅ. प्रशांत पन्हाळकर, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा.डाॅ. रवींद्र चव्हाण, विजय मांडके, प्रा. गाैतम काटकर यांच्यासह विद्रोहीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमात सुरूवातीला मान्यवरांनी आपले विचार मांडले. वाहरु सोनवणे म्हणाले, मानवजातीला आलेल्या अडचणींना ठोकर मारून पुढे जाणारा विद्रोह आहे. गाव, तालुका, राज्य आणि देशातही विद्रोह झाला पाहिजे. यासाठी आपण जागृती करायला हवी. आम्ही स्पर्धा करणारे नाही तर विचार पुढे घेऊन जाणारे आहोत. संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी नवं आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण हे महिलांच्या खांद्यावरून येणार आहे. महिलांनी या प्रवाहाबरोबर जुळवून घ्यावे, असे आवाहन केले. तसेच त्यांनी एक शाहिरीही गायली. याला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यानंतर संमेलनात विविध ठराव घेण्यात आले.
विद्रोहीच्या संमेलनातील ठराव...
- किल्ले संवर्धनात किल्ल्यांच्या इतिहासाला महत्व देण्यात यावे.
- पुण्यातील शनिवारवाड्यासमोर महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे भव्य पुतळे उभारावेत.
- शनिवारवाड्यात छत्रपती शाहू महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा उभा करावा.
- साताऱ्यात प्रतिसरकारचे यथायोग्य स्मारक उभे करावे.
- शाळा बंद विरोधी आंदोलन करणे.
- पंढरपूरच्या मंदिरातील महापुजेत पुरूषसुक्त काढून वारकरी संतांचे अभंग वापरावेत.
- एसटी वाचविणे
- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीबद्दल विश्वास पाटील यांचा निषेध.
- साताऱ्यातील भीमाबाई आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहत्या घराबाबत शासनाने लक्ष घालून लवकर स्मारक पूर्णत्वास न्यावे.
- महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
- जातनिहाय जनगणना करावी.
- बेळगावसह सर्व मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा.