Union Minister Ramdas Athawale News: एकीकडे बीड, परभणी, कृषी विभागातील घोटाळा, ईव्हीएम मशीन यांसारख्या विषयांवरून विरोधक महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महायुती मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. बड्या नेत्यांच्या भेटी गाठी वाढत चालल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत महायुती आणि मनसे युतीत असणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच महायुतीतील एका मित्रपक्षाने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल मागे टाकून आता पुढील महापालिका निवडणुकीच्या तयारीला राज ठाकरे लागले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याबाबतचा आपला विरोध कायम ठेवला आहे.
आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले ते ठीक. मात्र, त्यांना वारंवार भेटणे हे काही बरोबर नाही. राज ठाकरे यांना महायुतीत घेणे बरोबर नाही. त्यांचा महायुतीला काही फायदा होत नाही. ते आले तर आम्हाला काय मिळणार? मित्रपक्षांनी आम्हाला विचारात घेतले पाहिजे. आम्हाला आत्ताच काही मिळत नाही. राज ठाकरे आल्यावर काहीच मिळणार नाही. लोकसभेत त्यांचा काही फारसा फायदा आम्हाला झालेला नाही. राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना महायुतीबरोबर घ्यायचे वगैरे चर्चा सुरू आहेत. पण त्यांना घेऊ नये असे आमचे मत आहे. आम्ही असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाणे अयोग्य आहे असे नाही पण मला वाटते की, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही. महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.
दरम्यान, राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली, तेव्हा शासनाच्या तिजोरीत निधी होता. आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना निकष लावण्यात येत आहेत, असे सांगत रामदास आठवले यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला. तसेच महापालिकेच्या निवडणुका कधीही होतील. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांनी एकत्र निवडणूक लढावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये १० ते १२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे. तसेच नवी महामंडळे स्थापन केली जातील, त्यातील तीन अध्यक्षपदे तरी आम्हाला मिळाली पाहिजेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.