एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 19:49 IST2025-10-21T19:34:32+5:302025-10-21T19:49:54+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडीचे चित्र दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत.

एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
सोलापूर - ऐन दिवाळीत सोलापूरच्या राजकारणात राजकीय फटाके फुटत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपाने इतर पक्षातील ५ माजी आमदारांना गळाला लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात चर्चा करत या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. विशेष म्हणजे या माजी आमदारात सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादीचे ३ माजी आमदार आहेत. मात्र या पक्षप्रवेशावरून स्थानिक भाजपा कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडीचे चित्र दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यातच भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांचा उद्रेक भाजपाच्या कार्यालयासमोर पाहायला मिळाला. सोलापूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी फडणवीसांनी एका रात्रीत गेम फिरवला. बुधवारी देवेंद्र फडणवीस सोलापूरात होते. हा दौरा जिल्ह्यातील राजकारणाला निर्णायक वळण देणारा ठरला. कार्यक्रमाच्या स्टेजवरच सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही फडणवीसांना भेटले. मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही देवेंद्र फडणवीस यांना भेटले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ३ माजी आमदार भाजपात?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोलापूरात पक्षातील गळती रोखण्यासाठी अजित पवार गट डॅमेल कंट्रोल करत आहे. त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर दौरा करत पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अद्याप कुणीही आमचा पक्ष सोडलेला नाही. कार्यकर्त्यांचा दादांवर विश्वास आहे. जर कुणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. उद्या मीदेखील पक्ष सोडला तरीही राष्ट्रवादीची दुसरी टीम तिथे तयार असते. त्यामुळे मी गेल्याने पक्षाला मोठा फरक पडेल असं नाही. अनेक नवीन लोक पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत असं भरणे यांनी माध्यमांशी बोलताना पक्ष सोडून जाणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले.
भाजपा कार्यकर्ते नाराज, कार्यालयाबाहेर केले आंदोलन
दरम्यान, माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांमधून विरोध सुरू झाला आहे. घोटाळ्यात अडकलेले, कलंकित नेत्यांना पक्षात घेऊ नये यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे भाजपामधील असंतोष उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या ३ आमदारांसोबत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.