Sangli: चंद्रावर झळकणार वाटेगावच्या मुलांची नावे; 'नासा'च्या आर्टेमिस -२ मोहिमेत जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:38 IST2026-02-18T14:32:09+5:302026-02-18T14:38:44+5:30
अशी असेल मोहीम

Sangli: चंद्रावर झळकणार वाटेगावच्या मुलांची नावे; 'नासा'च्या आर्टेमिस -२ मोहिमेत जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला मान
धोंडीराम कुंभार
वाटेगाव (जि.सांगली) : ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेशी सांगली जिल्ह्यातील वाटेगावच्या जिल्हा परिषद शाळेशी नाते जोडले गेले आहे. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानावर येथील मुलांची अन् शिक्षकांची नावे झळकली जाणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पासेस ‘नासा’कडून दिले आहेत. हा क्षण शाळेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. या उपक्रमात नासाकडून केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद शाळा नं. १ वाटेगाव या शाळेने नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पासेस पाठवले. या बोर्डिंग पासेसचे वितरण मंगळवारी शाळेत विद्यार्थ्यांना केले.
नासाच्या या मोहिमे अंतर्गत सेंड युअर नेम टू द मून ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमात वाटेगावच्या मुलांना सहभागी करून घेण्यात आले आहे. नासाच्या अधिकृत पोर्टलवर ही नावे नोंदली गेली आहेत. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानावर या विद्यार्थ्यांची नावे असणार आहेत. एसडी कार्डद्वारे ती झळकणार आहेत.
त्यांना मोहिमेचे प्रक्षेपणही व्हर्च्युअली पाहता येणार आहे. वाटेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विकास पाटील, पद्मश्री राजाराम राजमाने, प्रसाद हसबनीस आणि विद्या पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी यांचे बोर्डिंग पासेस विद्यार्थ्यांच्या हाती दिले. या उपक्रमामागे शाळेतील प्रसाद हसबनीस यांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते.
अशी असेल मोहीम
आर्टेमिस-२ ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील नासाच्या ‘केनेडी स्पेस सेंटर’ येथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे समारे ६ लाख ८५ हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी नासाने हा उपक्रम आयोजित केला आहे.
उपक्रमाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक
या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, विस्तार अधिकारी छायादेवी माळी, केंद्रप्रमुख वसंत शिंगारे यांनी शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना या बालवयात अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, अंतराळवीर यांची माहिती व्हावी, त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने पेरली जावीत, म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे. - प्रसाद हसबनीस, शिक्षक, वाटेगाव
आर्टेमिस मोहिमेची समग्र माहिती, अंतराळात गुरुत्वाकर्षणविरहित वातावरणात अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, कसे झोपतात, हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत व्हावे, म्हणून आम्ही नासाच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. - विकास पाटील, मुख्याध्यापक