निवडणूक व्यवस्थेत ‘तामिळनाडू पॅटर्न’; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:37 IST2026-04-23T12:35:28+5:302026-04-23T12:37:55+5:30
मतदान पथकातील कर्मचारी, अधिकारी यांना मध्यवर्ती वितरण केंद्रावर आदल्या दिवशी पहाटेच पोहोचावे लागते आणि मतदानानंतरही साहित्य जमा करण्यासाठी जावे लागते, ही सगळी ससेहोलपट थांबविणारा तामिळनाडू राज्याने राबविलेला पॅटर्न आता महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

निवडणूक व्यवस्थेत ‘तामिळनाडू पॅटर्न’; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मतदान पथकातील कर्मचारी, अधिकारी यांना मध्यवर्ती वितरण केंद्रावर आदल्या दिवशी पहाटेच पोहोचावे लागते आणि मतदानानंतरही साहित्य जमा करण्यासाठी जावे लागते, ही सगळी ससेहोलपट थांबविणारा तामिळनाडू राज्याने राबविलेला पॅटर्न आता महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी बारामती आणि राहुरी मतदारसंघांत आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यामुळे मतदान प्रक्रियेतील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळला आहे.
मतदान केंद्रावर वापरायचे साहित्य मध्यवर्ती वितरण केंद्रावरून ताब्यात घेण्यासाठी तसेच मतदान संपल्यानंतर हे साहित्य केंद्रावर जमा करण्यासाठी मतदान पथकातील केंद्राध्यक्ष व सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहवे लागत असे. आता केवळ क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी साहित्य ताब्यात घेऊन ते संबंधित मतदान केंद्रावर थेट पोहोचवायचे आहे. बाकी कर्मचारी, अधिकारी हे थेट प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जातील. मतदान झाल्यानंतर क्षेत्रिय अधिकारी हे मतदान केंद्राध्यक्ष व पुरेसे सुरक्षा कर्मचारी/वर्ग ड कर्मचारी वगळता, अन्य कर्मचाऱ्यांनी वितरण केंद्रावर जाण्याची गरज नसेल. केंद्राध्यक्ष व क्षेत्रिय अधिकारी हे साहित्य नेऊन जमा करतील.
संजय यादव यांची कल्पना
मुंबईत सुरू करण्यात आलेला ‘कलरकोड’चा प्रयोग तामिळनाडूने स्वीकारला असून, याच निवडणुकीत त्याचा अंमल करण्यात आला आहे. सध्या राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक असलेले संजय यादव हे मुंबईचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी ‘कलर कोडिंग’चा हा प्रयोग राबविला होता. मतदाराच्या हाती मतदानासाठीची जी चिठ्ठी दिली जाते तिलाच रंगीत चिठ्ठी जोडून द्यायची आणि त्याच रंगाच्या कार्पेटवरून चालत त्याने बूथवर पोहोचायचे, छतालाही अशाच रंगीत पट्टया असतील, असा हा उपक्रम होता.
१२ अधिकाऱ्यांचे पथक करत आहे अभ्यास
तामिळनाडू पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील प्रत्येक विभागातील दोन अशा १२ अधिकाऱ्यांना सध्या तामिळनाडूत पाठविण्यात आले आहे.
तामिळनाडू पॅटर्नमुळे मतदान प्रक्रियेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती वितरण केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी वा मतदानानंतर जाण्याची गरज नाही. थेट मतदान केंद्रावर जाता येईल. एस. चोक्कलिंगम, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी