’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:57 IST2026-04-23T14:56:33+5:302026-04-23T14:57:09+5:30
Maharashtra News: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिलेल्या धमकीमुळे राज्यात मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. आता या प्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिलेल्या धमकीमुळे राज्यात मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. आता या प्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
या संदर्भात आपली भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव चित्रण कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक तथा पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी "पानसरेचे जे हाल केले, तसे हाल करू" अशी धमकी दिली आहे. छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. अशा महान विचारवंताचा धर्मांध शक्तींनी खून केला, त्यांच्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. असे असताना स्वतःला छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या आमदाराने त्यांच्याच हत्येचा दाखला देत इतरांना धमक्या देणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. धमकी देणाऱ्या आमदार विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे!
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच गृहमंत्री आहेत. त्यांनी सत्तेसाठी अशा निर्बुद्ध आमदारांना पाठीशी न घालता तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच सत्ताधारी आमदाराकडून जीवाला धोका असल्यामुळे प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे !