कर्नाटकसह गोव्यात सहा पथके रवाना

By Admin | Updated: June 8, 2015 01:26 IST2015-06-08T01:26:12+5:302015-06-08T01:26:12+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा पथके शनिवारी रात्रीच कर्नाटकसह गोव्यास रवाना झाली आहेत.

Six teams to go to Goa with Karnataka | कर्नाटकसह गोव्यात सहा पथके रवाना

कर्नाटकसह गोव्यात सहा पथके रवाना


कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा पथके शनिवारी रात्रीच कर्नाटकसह गोव्यास रवाना झाली आहेत. तसेच दोन पथके स्थानिक पातळीवर तपास करीत आहेत. प्रत्येकास स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे, अशी माहिती ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी रविवारी दिली.
पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयामध्ये आठ विशेष पथकांच्या प्रमुखांबरोबर संजयकुमार यांची बैठक झाली. पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे (स्केचेस) एसआयटीने तयार केली असून त्या आधारे मारेकऱ्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचा सूचना पथकांना दिल्या असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले.
मारेकरी सुभाषनगर रोडवरून भरधावपणे शिवाजी विद्यापीठमार्गे कागलच्या दिशेने निघून गेले असल्याचे धीरज कन्स्ट्रक्शन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या मार्गावर कोठे-कोठे सीसीटीव्ही आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यांचे फुटेज उपलब्ध करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
पोलिसांच्या तपासाची दिशा बदलण्यासाठी मारेकऱ्यांनी दूधगंगा नदीमध्ये दुचाकी टाकून ते परत कोल्हापुरात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ते कर्नाटक किंवा गोवा राज्यांतही आश्रयाला जाऊ शकतात. त्यामुळे कर्नाटक व गोवा राज्यांतील काही प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्हीचे फुटेजही मिळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

मारेकऱ्यांची रेखाचित्रे
संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे राज्यभरातील सराईत गुन्हेगार, शार्प शूटर, सुपारी किलर तसेच कारागृहांत असलेल्या कैद्यांना दाखविण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे संजयकुमार यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Six teams to go to Goa with Karnataka