बापरे! लॉकडाऊनमध्ये चांदीचे दर ५० हजारांवर; सोन्याचे दर माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:09 AM2020-06-06T05:09:06+5:302020-06-06T06:07:55+5:30

सोनेही ४७,३०० वर : लॉकडाउन ते ‘अनलॉक’ दरम्यान चांदीत ११ हजार रु पयांची वाढ

Silver price rises to Rs 50,000 | बापरे! लॉकडाऊनमध्ये चांदीचे दर ५० हजारांवर; सोन्याचे दर माहितीयेत का?

बापरे! लॉकडाऊनमध्ये चांदीचे दर ५० हजारांवर; सोन्याचे दर माहितीयेत का?

Next

विजयकुमार सैतवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे विदेशातून होेणारी चांदीची आवक कमी झाल्याने चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, सोनेदेखील ४७ हजार ३०० रु पये प्रतितोळा झाले आहे. मार्च महिन्यातील लॉकडाऊन ते अनलॉकच्या दरम्यान चांदीच्या भावात किलोमागे ११ हजार रुपये तर सोन्याच्या दरात तोळ्याला चार हजार ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, ५ जूनपासून सुवर्ण बाजार सुरू होताच सोने-चांदी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.


कोरोनामुळे २३ मार्चपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्याने ५ मेपासून सुवर्ण बाजार सुरू झाला होता. मात्र अवघ्या तीन दिवसात पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे सुवर्णपेढ्या बंद करण्यात आल्या होत्या.


आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात ५ जूनपासून जीवनावश्यक वस्तूंसह इतरही व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सुवर्णबाजार उघडताच चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सोन्याचेही भाव ४७ हजार ३०० रु पयांवर पोहचले. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. चांदी ही वजनदार असल्याने ती जहाजाद्वारे येते. मात्र सध्या ब्राझीलमधून येणाऱ्या चांदीची आवक बंद असल्याने चांदीचे भाव वधारले आहेत. लॉकडाऊन सुरू झाले त्यावेळी सोन्याचे भाव चांदीपेक्षा जास्त होते. मात्र आवक नसल्याने चांदीने सोन्यालाही मागे टाकत थेट ५० हजारावर झेप घेतली आहे.

अडीच महिन्यांत ११ हजार रुपयांची वाढ
२२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व २३ मार्चपासूनच्या लॉकडाऊनपूर्वी २१ मार्च रोजी सुवर्णबाजार बंद झाला त्या वेळी सोन्याचे भाव ४३ हजार रुपये प्रतितोळा तर चांदी ३९ हजार रुपये प्रति किलोवर होते. मध्यंतरी ५ मे रोजी सुवर्णबाजार सुरू होताच सोन्याचे भाव ४६ हजार रु पये प्रतितोळा तर चांदी ४४ हजार रु पये किलोवर पोहोचली होती. त्यामुळे अडीच महिन्यात चांदीत ११ हजार रु पये प्रतिकिलो अशी वाढली आहे.

बाजार सुरू झाल्याने भाव होतील कमी : आवक नाही व त्यात सुवर्णपेढ्या बंद यामुळे बाजारात चांदी उपलब्ध होत नव्हती. आता सुवर्णबाजार सुरू झाल्याने मोडीसाठीदेखील ग्राहक येतील. त्यामुळे बाजारात चांदीची उपलब्धता होईल व भाव सामान्य होतील, असे संकेत सुवर्ण व्यावसायिकांकडून दिले जात आहेत.
कोरोनामुळे सोने-चांदीची आवक थांबली आहे. या काळात आवक मंदावली असून, बाजारात मोडही येत नसल्याने चांदीचे भाव वधारले. मात्र लवकरच ते सामान्य होतील.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

Web Title: Silver price rises to Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं