Maharashtra Assembly Monsoon Session: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, धारावी पुनर्विकास प्रकल्प यांसह अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत होत असलेल्या चर्चांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोले लगावत असून, आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे कोकणतील नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भास्कर जाधव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करू शकतात, असाही कयास बांधला जात आहे. तर, कोकणातील शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच विधानसभेतील चर्चेवेळी भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री योगेश कदम यांना एक वडीलकीचा सल्ला दिल्याचे म्हटले जात आहे.
चांगले काम करा, जे कोकणाच्या हिताचे आहे
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत चर्चेवेळी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे बघत भास्कर जाधव म्हणाले, राजकारणासाठी एकमेकांवर टीका, आरोप करणे तेवढ्यापुरते ठीक आहे. तुम्ही कायमस्वरूपी त्यात अडकून नका. तरुण आहात, तुम्हाला भवितव्य घडवायचे असेल तर या टीका व आरोपांतून ते घडणार नाही, हे मी आजच सांगतो. काही तरी विधायक, चांगले काम करा, जे कोकणाच्या हिताचे आहे. राज्याचे तुम्ही मंत्री आहात हे मला माहिती आहे, पण आता मंत्री राज्याचा कुठला कपाळाचा राहिलाय, आता जिल्ह्याही मंत्री राहिला नाही, आता प्रत्येक मंत्री स्वतःच्या मतदारसंघापुरता राहिला आहे. तुम्ही याचा विचार करावा, असा वडिलकीचा सल्ला जाधव यांनी योगेश कदम यांना दिला.
दरम्यान, उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते आमदार भास्कर जाधव यांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. गेली ३५ ते ४० वर्षे आमदार भास्कर जाधव हे सक्रिय राजकारणात आहेत. आता राजकारणात थांबावेसे वाटते, असे भास्कर जाधव म्हणाले होते. पक्षांतर्गत आपले विरोधक, विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहीर करण्यास झालेला उशीर, नाव जाहीर झाल्यानंतरही त्याला होत असलेला विलंब याबाबत त्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आमदार जाधव यांनी ‘थांबण्या’चा मुद्दा काढल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.