राज्यात परतण्यास शरद पवारांचा नकार

By Admin | Updated: June 9, 2014 02:31 IST2014-06-09T02:31:06+5:302014-06-09T02:31:06+5:30

मी दिल्लीतच बरा आहे, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Sharad Pawar's refusal to return to the state | राज्यात परतण्यास शरद पवारांचा नकार

राज्यात परतण्यास शरद पवारांचा नकार

मुंबई : ‘मी दिल्लीतच बरा आहे, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पण त्याचवेळी सामूहिक नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढविली जाईल, असे सांगत मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेले अजित पवार यांच्या मनसुब्यांना मात्र धक्का दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित सोहळ्यात पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव, विधानसभा निवडणुकीआधी नेतृत्व जाहीर करण्याची अजित पवार यांनी केलेली मागणी आणि शरद पवार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची पुढे आलेली मागणी, या सर्व घडामोडींमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. १५ वर्षे सत्तेत राहिल्यामुळे नेता व कार्यकर्ता यांच्यातील दरी अधिक वाढली आहे. आपल्या विभागात विकासकामे केल्याची आकडेवारी नेते मांडतात. पण, केवळ विकासकामे करून भागत नाही. त्याला माणुसकीचा चेहराही हवा असतो. त्यामुळे जनतेशी सुसंवाद ठेवत विकासकामे करा, अशा कानपिचक्या पवारांनी दिल्या. ज्या कार्यकर्त्यांच्या जिवावर पक्ष उभा आहे, त्यांचा सन्मान ठेवा. कार्यकर्त्याने हात दाखवला तर गाडी थांबवा, काच खाली करून त्यांच्याशी बोला. त्यांना सन्मान दिला नाही, तर ते जागा दाखवतात, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sharad Pawar's refusal to return to the state