सर्व्हिस रोड नोव्हेंबरअखेर पूर्ण

By Admin | Updated: May 2, 2015 01:23 IST2015-05-02T01:23:04+5:302015-05-02T01:23:04+5:30

घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या ठिकाणी दोनही बाजूने छोट्या वाहनांसाठी सेवा रस्ता असावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर या ठिकाणी

Service road completed by november | सर्व्हिस रोड नोव्हेंबरअखेर पूर्ण

सर्व्हिस रोड नोव्हेंबरअखेर पूर्ण

ठाणे : घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या ठिकाणी दोनही बाजूने छोट्या वाहनांसाठी सेवा रस्ता असावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर या ठिकाणी १४ किमीच्या सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार, पातलीपाड्यापर्यंत या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा किमीच्या रस्त्यात वन विभाग, एमएसईबीचे ट्रान्सफॉर्मर आदींसह इतर अतिक्रमणांचा अडथळा आल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, आता या अडथळ्यांची शर्यत पार करून येत्या नोव्हेंबरअखेरपर्यंत या सेवा रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.
घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्याच्या दोनही बाजूला कापूरबावडी ते गायमुख अशा १४ किमीच्या सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पातलीपाड्यापर्यंतच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील सेवा रस्त्याचे काम शिल्लक असल्याने सध्या यावर कारवाईसुद्धा केली जात नसल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. सेवा रस्ता पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता केवळ लहान वाहनांसाठीच खुला केला जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले. या दोनही बाजूकडील सेवा रस्त्याचा खर्च हा ९३.८८ कोटी आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात २६४ बांधकामे बाधित झाली आहेत. यामध्ये ३५ निवासी आणि २२९ व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. परंतु, आता दुसऱ्या टप्प्यात वन विभागाचा सव्वा किमीचा रस्ता येत असल्याने त्यांनी अद्यापही परवानगी दिली नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तसेच महावितरणचे काही ट्रान्सफॉर्मरदेखील या सेवा रस्त्यात येत आहेत. मानपाडा भागातील ट्रान्सफॉर्मर अद्यापही हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे हादेखील मोठा अडथळा या सेवा रस्त्यात आहे. तसेच एका कंपनीचे गेटही या सेवा रस्त्यात येत आहे. परंतु, यासंदर्भात पावले उचलून पुढील कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. १५ नोव्हेंबर ही या सेवा रस्त्याची डेडलाइन आहे. परंतु, याच कालावधीत हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल असेही पालिकेने स्पष्ट केले.

Web Title: Service road completed by november