Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:23 IST2025-10-24T14:22:51+5:302025-10-24T14:23:54+5:30
Satara Crime, Doctor rape, Suicide case news: महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावरच एक चिठ्ठी लिहिली होती. यात ग्रामीण पोलीस ठाण्याचा पीएसआय गोपाल बदने आणि अन्य एका व्यक्तीचे नाव लिहिले होते.

Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने पोलीस उपनिरिक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत आत्महत्या केली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली असून महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी खासदारांच्या दोन पीएंचा उल्लेख असणारे पत्र महिला डॉक्टरनेपोलिसांना दिले होते. या तक्रारीचे काय झाले, असाही सवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान संशयित आरोपी बदने व त्याच्या साथीदार बनकर हे दोघेही फरार असल्याचे समोर येत आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावरच एक चिठ्ठी लिहिली होती. यात ग्रामीण पोलीस ठाण्याचा पीएसआय गोपाल बदने आणि अन्य एका व्यक्तीचे नाव लिहिले होते. सुरुवातीला हा पोलीसच असल्याचे यात म्हटले होते. परंतू, तो पोलीस नसल्याचे आता प्रशासन सांगत आहे. प्रशांत बनकर याचे त्यात नाव असून त्याने मानसिक आणि शारिरीक त्रास दिल्याचे या डॉक्टरने हातावर लिहिले होते.
पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही, याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत, असे महिला आयोगाने एक्स अकाऊंटवर म्हटले आहे. याचबरोबर मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत.
दोन पथके तयार...
दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे. समाजाच्या रक्षकानेच असे कृत्य करावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपींवर कठोर करावाई होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.